यवतमाळ : पुलगाव येथील केंद्रीय आयुध भंडारातील दारूगोळा वाचविताना प्राणाची बाजी लावणारा यवतमाळचा सुपुत्र शहीद प्रमोद उर्फ बादल महादेव मेश्राम यांना शेकडो नागरिकांच्या उपस्थितीत साश्रूनयनांनी मंगळवारी अखेरचा निरोप देण्यात आला. यावेळी हवेत बंदुकीच्या फैरी सोडून त्याला मानवंदना देण्यात आली. यवतमाळ येथील पाटीपुरा परिसरातील प्रमोद मेश्राम हा केंद्रीय राखीव दलात कार्यरत होता. तेथून करार संपल्यानंतर तो पुलगावच्या केंद्रीय आयुध भंडारात अग्नीशमन दलात दाखल झाला. सोमवार ३० मेच्या रात्री या भंडाराला भीषण आग लागली. या आगीतून दारूगोळा वाचविताना प्रमोदने प्राणाची बाजी लावली. मात्र या ठिकाणी झालेल्या भीषण स्फोटात प्रमोद शहीद झाला. आगीत होरपळलेला त्याचा मृतदेह ओळखण्यासाठी डीएनए चाचणी करावी लागली. तब्बल सात दिवसानंतर त्याची ओळख पटली. सात दिवस संयमाचा बांध ठेऊन मेश्राम कुटुंबिय प्रमोदच्या पार्थिवाची प्रतीक्षा करीत होते. मंगळवारी सकाळी सैनिक प्रशासनाने प्रमोदचे पार्थिव कुटुंबियाच्या स्वाधीन केले. दुपारी पाटीपुरा येथील निवासस्थानी प्रमोदचे पार्थिव पोहोचताच शोक अनावर झाला. यानंतर अंत्ययात्रा काढण्यात आली. फुलांनी सजविलेल्या ट्रॅक्टरवर प्रमोदचा पार्थिव ठेवण्यात आले. ट्रॅक्टरला तिरंगा ध्वज लावण्यात आले होते. प्रमोद मेश्राम अमर रहेच्या घोषणात अंत्ययात्रा पाटीपुरा, गणेश चौक, गांधी चौक, तहसील चौकातून पांढरकवडा मार्गावरील स्मशानभूमीत पोहोचली. शहरात विविध ठिकाणी शहीद प्रमोदला अभिवादन करण्यात आले. स्मशानभूमीत हवेत बंदुकीच्या फैरी झाडून प्रमोद मेश्रामला अखेरची मानवंदना देण्यात आली. प्रमोदचा मुलगा पार्थ (८) आणि यथार्थ (६) या दोन पुत्रांनी आपल्या वीर पित्याच्या पार्थिवाला भडाग्नी दिली. (कार्यालय प्रतिनिधी)
पुलगाव अग्निकांडातील शहिदाला अखेरचा सलाम
By admin | Updated: June 8, 2016 02:06 IST