प्रेरणादायी उपक्रम : दत्तापूरच्या प्रयोगशील शेतकऱ्याची यशोगाथा, शेतीला दिली दुग्धव्यवसायाची जोड दारव्हा : तालुक्यातील दत्तापूर या शेवटच्या टोकावरील खेड्यातील एका तरुणाने जिद्द आणि परिश्रमाला कल्पकतेची जोड देत आपले कोरडवाहू शेत हिरवेकंच केले. सिंचननासाठी अपुरे पडणारे शेततळे २५ फुट खोल केले अन् येथूनच त्याला नवीन दिशा गवसली. शेततळ््यालाच भरपूर पाणी लागल्याने आता त्याच्या शेतात हळद, डाळींब आणि केळीची फळबागही फुलली आहे. सोबतच दुग्धव्यवसायही वाढीस लागला आहे. एका तरुणाची ही यशोगाथा अनेकांसाठी प्रेरणादायी ठरली आहे. प्रवीण गायकी हे त्या प्रयोगशील युवा शेतकऱ्यांचे नाव आहे. देशभरात यवतमाळ जिल्हा दुर्दैवाने आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांचा जिल्हा म्हणून ओळखला जातो. मात्र जिद्द व नावीन्यपूर्ण प्रयोगातून समृद्ध साधणारे काही व्यक्ती इतरांसाठी पेरणादायी ठरतात. अशाच जिद्दी आणि प्रयोशील शेतकरी प्रवीण गायकी या शेतकऱ्याचे तालुक्यापासून आठ किलोमीटर अंतरावर आडवळणात असलेल्या दत्तापूर येथे कोरडवाहू शेती होती. गत सात वर्षापूर्वी त्यांची सिंचनासाठी सोय व्हावी म्हणून शेततळे केले. कोरडवाहू शेतीच्याच भरवशावर सुरूवातीला जोडधंदा म्हणून एक म्हैस खरेदी केली. या म्हशीचे दूध तालुक्याला विकायचे व शेती कसायची, अशी त्याची दिनचर्या. शेततळ््यातील पाणी सिंचनाजोगे साठवत नसल्याने त्याने हेच शेततळे २५ फुटापर्यंत खोल केले. यात त्याला विहिरीसारखेच पाणी लागले. या पाण्याच्या आधारावर प्रवीणने हळूहळू हळद, डाळींब व केळीची लागवड केली. सध्या त्यांचे शेतात ठिबक संचावर दोन एकर क्षेत्रात केळीची बाग आहे. दीड एकर क्षेत्रात डाळींब तर दोन एकर क्षेत्रात हळद लागवड केली आहे. शेततळ््यावर उभारलेल्या पिकातून आर्थिक स्थैर्य आल्यानंतर लगतच भावाच्या शेतात विहीर खोदली आहे. त्यावर सुद्धा कोरडवाहू क्षेत्र ओलिताखाली आणले. ओलिताची शाश्वत सोय झाल्याने प्रवीणने दुधाळ जनावरे वाढविली. त्याकरिता शेतात चारापीक लावले. आज त्याच्याकडे दहा दुधाळ जनावरे आहेत. अनेकांनी दुग्ध व्यवसाय सुरू केला आहे. प्रवीणने दत्तापूर येथे मुंगसाजी माऊली दूध उत्पादक संस्था स्थापन केली असून, या संस्थेव्दारे दररोज शासकीय दूध डेअरीला ४०० लिटर दूध पुरविले जाते. प्रवीणने येथेच न थांबता यवतमाळ येथील लोहारा भागात खासगी प्रथमेश दूध डेअरी उभारली आहे. याठिकाणी सर्व दुधापासूनचे पदार्थ विक्रीस उपलब्ध आहेत. विशेष म्हणजे शेतीकरिता आजपर्यंतही आपण कोणत्याही शासकीय योजनेचा लाभ घेतला नसल्याचे प्रवीण स्वाभिमानाने सांगतो. शेतीच्या नाविन्यपूर्ण प्रयोगाबाबत आपल्याला त्यांचे काका रघुनाथ गायकी व परिसरातील शेतकऱ्यांचेच मार्गदर्शन लाभल्याचे त्यांने ‘लोकमत’ला सांगितले. (प्रतिनिधी)
शेततळ््याचा खड्डाच ठरला विकासाचा झरा
By admin | Updated: December 28, 2016 00:30 IST