सालदार बाद : महिन्याने यायलाही कुणी तयार नाहीपुसद : निसर्गाच्या लहरीपणाने शेतकरी मेटाकुटीस आला असताना आता शेतात राबण्यासाठी मजूरही मिळत नाही. यांत्रिकीकरणाचा उपयोग केला तरी काही खास ठिकाणी मन्युष्यबळाचीच गरज भासते. परंतु आज शेतातील निम्नदर्जाचे काम करायला कुणी तयार नाही. पूर्वी दिसणारे सालदार आता बाद झाले असून महिन्यानेही काम करायला कुणी मिळत नाही. गुढीपाडव्यापासून अक्षयतृतीयेपर्यंत सालदारच मिळाला नसल्याने शेतमालकावर मोठा बाका प्रसंग आला आहे.एक काळ असा होता की शेतकरी आणि शेतमजूर एका नाण्याच्या दोन बाजू होत्या. शेतमजुरांचा उदरनिर्वाह शेतीवर चालत असे. एकाच शेतकऱ्याच्या घरी पिढ्यान्पिढ्या शेतमजुरी केली जात असे. त्यातूनच सालदार ही पद्धत रुढ झाली. वर्षभराचा करार करून ठराविक रक्कम व धान्य सालदाराला दिले जात होते. या बदल्यात सालदार सकाळी ६ ते रात्री ८ वाजेपर्यंत शेतमालक सांगेल ती कामे करीत होता. शेतकरीसुद्धा शेतीकामासाठी सालदाराला घरच्या व्यक्तीप्रमाणे वागवत होता. शिक्षणाचा अभाव, प्रचंड गरिबी यामुळे सालाने राहणे त्या काळी गरजेचे झाले होते. परंतु आता खेडी बदलत चालली आहे. दळणवळणाच्या सुविधा निर्माण झाल्या आहे. शहरे वेगवान वाहनांमुळे जवळ आली आहे. गावागावापर्यंत हॉटेल, ढाबे, पानटपऱ्या पोहोचल्या आहे. त्यामुळे खेड्यातील माणूस आता शेतीतील निम्नदर्जाची कामे करायला तयार नाही. त्यातच शासनाच्या विविध योजनांतून मिळणारे धान्यही यासाठी कारणीभूत ठरत आहे.शेतात सालदार ठेवण्यासाठी आता शेतकरी मजुरांची मिनतवारी करताना दिसतो. सालदारच काय महिन्याने राहायलाही कोणी तयार नाही. सकाळी मिळालेला मजूर सायंकाळपर्यंत कामावर राहीलच याची खात्री नाही. शेतावर काम करण्याऐवजी लगतच्या शहरात जावून प्रचंड कष्टाची कामे करतील. गुढीपाडव्याला सालदार ठेवला जातो. परंतु आता अक्षयतृतीया आली तरी अनेक शेतकऱ्यांकडे सालदारच दिसत नाही. शेतीची अनेक कामे आता यंत्राच्या साहाय्याने केली जात आहे. ट्रॅक्टर शेतकऱ्यांसाठी वरदान ठरले आहे. आजही अनेक कामांसाठी मनुष्यबळाचीच आवश्यकता असते. यासाठी शेतकरी मजुराच्या शोधात असतो. दिवसाला २०० ते २५० रुपये रोज देऊनही शिकलेली पिढी शेतात राबायला तयार नाही. (तालुका प्रतिनिधी)
शेतामध्ये राबायला गावागावांत मजूरच मिळेना
By admin | Updated: April 20, 2015 00:08 IST