वणी : सुमारे १० ते १२ वर्षांपूर्वी तालुक्यातून वाहणाऱ्या काही नदी-नाल्यांवर चार कोल्हापुरी बंधारे बांधण्यात आले होते. आता त्यातील एकाही बंधाऱ्यात पाणी अडविले जात नसल्याने हे कोल्हापुरी बंधारे बिनकामाचे ठरले आहेत. या बंधाऱ्यांच्या बांधकामावर झालेला कोट्यवधींचा खर्च पाण्यात गेला आहे.राज्यात विदर्भ आणि मराठवाडा हे दोन विभाग कायम टंचाईग्रस्त असतात. मराठवाड्यात तर पाणी प्रश्न अत्यंत गंभीर आहे. सुदैवाने विदर्भातून काही मोठ्या नद्या वाहतात. त्यामुळे येथे पाण्याची थोडी मुबलकता आहे. मात्र पाणी अडविण्याची प्रभावी उपाययोजना नसल्याने सर्व पाणी वाहून जात आहे. या वाहून जाणाऱ्या पाण्याचे योग्य व्यवस्थापन करण्याची खरी गरज निर्माण झाली आहे. मात्र त्याकडे कुणीच आणि कधीच गांभीर्याने लक्ष देण्यास तयार नसल्याचे चित्र दिसून येत आहे.पश्चिम महाराष्ट्रात अनेक नदी, नाल्यांवर बंधारे बांधण्यात आले आहेत. हे बंधारे त्या परिसरातील शेतकऱ्यांसाठी वरदान ठरले आहे़ १0 ते १२ वर्षांपूर्वी त्याच अनुषंगाने कोल्हापूर जिल्ह्यात बंधारे बांधण्यास सुरूवात करण्यात आली होती. तेथे या बंधाऱ्यांची उपयुक्तता सर्वांच्या नजरेस आली होती. या बंधाऱ्यांची सुरूवात कोल्हापूर जिल्ह्यातून झाल्याने त्यांना ‘कोल्हापुरी बंधारे’ असे नाव देण्यात आले होते. दगडी बांधकाम करून दरवाजावर लोखंडी बरगे बसवून आवश्यक तेव्हा नदी, नाल्यांच्या प्रवाहाचे पाणी या बंधाऱ्यांत अडविले जात होते. या बंधाऱ्यांची उपयुक्तता लक्षात घेऊन राज्य शासनाने कोल्हापुरी बंधाऱ्यांचे हे ‘मॉडेल’ विदर्भात आणले. या बंधाऱ्यांच्या माध्यमातून सिंचन सुविधा निर्माण करण्याचे लक्ष ठेवण्यात आले होते. वणी तालुका सिंचनात आधीच मागासलेला आहे. आहे़ मात्र तालुक्यात पाण्याची मुबलकता आहे़ वर्धा आणि पैनगंगा या दोन मोठ्या नद्यांसह निगुर्डा व विदर्भा या दोन लहान नद्या व बारमाही वाहणारे काही नाले, तालुक्यात अस्तित्वात आहेत. त्यामुळे पाण्याचा सुकाळ आहे़ तथापि या पाण्याचा अद्याप व्यवस्थित वापर होत नसल्याने हे पाणी वाहून जात आहे़ पूर्वी वणी तालुक्यातून वाहणाऱ्या नद्या, नाले, ओढे बारमाही वाहत होते. आता उन्हाळ्यात या नद्या, नाले कोरडे पडतात. पावसाच्या लहरीपणामुळे पाणीटंचाई निर्माण होते. शेतीलाही पाणी मिळत नाही.तशी तालुक्यातील शेती सुपिक आहे़ मात्र तब्बल ८५ टक्के शेती कोरडवाहू आहे. ही शेती पावसावर अवलंबून अहे. मात्र पावसाच्या लहरीपणामुळे शेतकऱ्यांना कधी कोरडा, कधी ओल्या दुष्काळाला सामोरे जावे लागत आहे. मागीलवर्षी ओला, तर यावर्षी कोरड्या दुष्काळाच्या छायेत शेतकरी सापडले आहेत.सिंचनाची सुविधा नसल्याने आणि पावसाच्या लहरीपणामुळे या तालुक्यातील शेतकरी सतत कर्जाच्या ओझ्याखाली दबलेला असतो़ परिणामी शेतकरी आत्महत्या वाढत आहे. दुसरीकडे नवीन पिढीतील युवक शेती व्यवसायाकडे दुर्लक्ष करीत आहे़ ते एखाद्या दुकानात नोकरी करतात, मात्र शेती करण्यास धजावत नाही. या परिस्थितीमुळे शेतकरी पुत्राला कुणी मुलगी द्यायलाही धजावत नाही़ त्यातच पिकांचा उतारा कमी येत असल्याने अनेक युवक शेतीकडे वळण्यास कचरतात. लावलेला खर्चही शेतीत निघत नसल्याने शेतकरी प्रचंड निराशेच्या सावटाखाली वावरत आहेत.तालुक्यात शेती सिंचनाचा अभाव असल्याने शेतात दोन हंगामात पिके घेण्याची संधी शेतकऱ्यांना मिळत नाही. ज्यांच्याकडे ओलिताची सुविधा आहे, त्यांना सिंचन करता येत नाही. भारनियमनाच्या अतिरेकाने पाणी असूनही त्यांना ओलीत करणे कठीण झाले आहे. त्यामुळेच १0 ते १२ वर्षांपूर्वी ही परिस्थीत लक्षात घेऊन राज्य शासनाने प्रयोग म्हणून विदर्भा नदीवर पुरड व कुंड्रा गावाजवळ, निगुर्डा नदीवर वागदराजवळ आणि वारगाव येथील नाल्यावर कोल्हापुरी बंधारे बांधले होते. या बंधाऱ्यांमुळे संबंधित परिसरातील शेतकऱ्यांना हायसे वाटले होते. आता शेतीत जादा उत्पन्न घेता येईल, असा आशावाद त्यांच्यात निर्माण झाला होता. त्यांच्या डोळ्यात हिरवे स्वप्न दिसू लागले होते. जेथे कोल्हापुरी बंधारे निर्माण करण्यात आले, त्या गावांमध्ये लगेच पाणी वाटप संस्थांची स्थापनाही करण्यात आली होती. या कोल्हापुरी बंधाऱ्याला लोखंडी बरगे बसवून पाणी अडविण्यास सुरूवातही करण्यात आली होती. मात्र गणित कुठे चुकले कुणास माहीत, या चारही बंधाऱ्यांमध्ये पाणी अडलेच नाही़ ते नुसतेच उबे झाले. आता तर या बंधाऱ्यांची स्थिती अत्यंत भयावह झाली आहे. त्यांच्याकडे कुणाचेच लक्ष नसल्याने लोखंडी बरगे चोरट्यांनी लंपास केले आहेत. त्यांचा अद्याप कुणालाही शोध लागलेला नाही. (कार्यालय प्रतिनिधी)
कोल्हापुरी बंधारे झाले कुचकामी
By admin | Updated: October 25, 2014 22:50 IST