वैद्य नगरातील घटना : महिला धडकल्या, आरोपीची दगडफेकयवतमाळ : दारु विक्रीला विरोध केल्याने पोलीस पाटलाचा खून केल्याची घटना ताजी असतानाच यवतमाळातील एका दारू विके्रत्याने विरोध करणाऱ्या तरुणीला चाकू लावला. त्यामुळे संतप्त झालेल्या महिला वडगाव रोड ठाण्यावर धडकल्या. परंतु पोलिसांनी तक्रार घेण्यास नकार दिल्याने त्यांनी जिल्हा कचेरी गाठली.यवतमाळ जिल्ह्यात संपूर्ण दारुबंदीसाठी आंदोलन सुरू आहे. ठिकठिकाणी मोर्चे काढून दारु विक्रीला विरोध केला जात आहे. याप्रकाराने धाबे दणाणलेले दारु विक्रेते आता आक्रमक होत आहे. यवतमाळ तालुक्यातील यावलीचे पोलीस पाटील विरेंद्र राठोड यांचा दारु विक्रेत्यांनी खुन केला ही घटना ताजी असताना रविवारी येथील वैद्य नगरातील एका दारु विक्रेत्याने एका तरुणीला चक्क चाकू लावून धमकाविण्याचा प्रयत्न केला. या प्रकाराने घाबरलेल्या तरुणीने आरडाओरड केली. उलट दारु विक्रेत्यानेच परिसरातील नागरिकांच्या घरावर दगडफेक केली. याप्रकाराने संतप्त झालेल्या महिला वडगाव रोड पोलीस ठाण्यात पोहोचल्या. परंतु त्यांची तक्रार घेण्यास पोलिसांनी नकार दिला. त्यामुळे या महिला येथील जिल्हा कचेरीवर पोहोचल्या. त्यांनी तेथे उपस्थित असलेले पालकमंत्री संजय राठोड आणि जिल्हाधिकारी सचिंद्र प्रताप सिंह यांना निवेदन दिले. यावेळी वर्षा राठोड, जया मरकाम, उषा तिवारी, वनमाला जाधव, आरोही मुखाडकर, किरण गुल्हाने, मंजुषा खंडारे, रजनी मडकाम आदी उपस्थित होत्या. (शहर वार्ताहर)
दारू विक्रेत्याने भरवस्तीत लावला तरुणीला चाकू
By admin | Updated: July 7, 2015 01:57 IST