अक्षय टोळी : बाभूळगावात डांबून मारहाण लोकमत न्यूज नेटवर्क यवतमाळ : स्थानिक बांगरनगर पेट्रोल पंप परिसरातून रिव्हॉल्वर व चाकूचा धाक दाखवून ‘अक्षय’ टोळीने गुरूवारी सायंकाळी युवकाचे अपहरण केले. त्याला बाभूळगाव येथील घरात डांबून बेदम मारहाण केली. नंतर साडे चार लाखांचा मुद्देमाल हिसकावून घेतल्याप्रकरणी शहर पोलिसांनी गुन्हा दाखल केला. सचिन किसनराव मांगुळकर (३३) रा. चांदोरेनगर, हा युवक गुरूवारी सायंकाळी बोलेरोने (क्रमांक एम.एच. २९-ए.डी. ३६०४) बांगरनगर पेट्रोल पंपाजवळून जात होता. अक्षय राठोड व त्याचे साथीदार अनिकेत गावंडे, बगीरा, करण, पोपट व इतर दोघांनी सचिनला रिव्हॉल्वरचा धाक दाखवून बाभूळगाव येथे नेले. तेथे अनिकेतच्या घरी डांबून त्याला बेदम मारहाण केली. नंतर गळ्यातील २७ ग्रॅमची सोन्याची चेन, अंगठी, एटीएम, पॅनकार्ड, आधार कार्ड व रोख २५ हजार हिसकावून घेतले. आरोपींनी बोलरो वाहन ताब्यात घेऊन पळ काढला. सचिनने याबाबत कुटुंबियांना माहिती दिली. नंंतर त्याला नागपूर येथील एका खासगी रूग्णालयात दाखल करण्यात आले. याप्रकरणी शहर पोलीस ठाण्यातील सहायक निरीक्षक मिलन कोयल यांनी त्याचे बयाण घेऊन गुन्हा दाखल केला. आठवडाभरापूर्वीच आला बाहेर अक्षय राठोड हा आठवडाभरापूर्वी कारागृहातून जामीनावर सुटला. परत येताच त्याने बाभूळगावातील रेती घाटावर आपला दबदबा निर्माण करण्याच्या हालाची सुरू केल्या. त्यातून हा हल्ला झाल्याची शक्यता वर्तविली जात आहे. व्यावसायीक स्पर्धेतून ही घटना घडली का, याचाही शोध सुरू आहे.
युवकाचे अपहरण
By admin | Updated: June 3, 2017 00:40 IST