किशोर वंजारी ।आॅनलाईन लोकमतनेर : समाजाचे आपणही काही देणे लागतो, या भावनेतून वेळात वेळ काढून गावागावात प्रबोधनाचा वर्गच जणू खाकी वर्दीतल्या माणसाने सुरू केला आहे. नेर पोलीस ठाण्यात कार्यरत असलेल्या मंगलसिंग चव्हाण या पोलीस कर्मचाºयाचे हे सामाजिक योगदान प्रेरणास्रोत ठरणारे आहे. कर्तव्य आणि सामाजिक भान जपत चव्हाण यांनी सुरू केलेल्या कार्याला लोकांचीही चांगली साथ लाभत आहे.दिग्रसच्या अंबिकानगरात राहणारे आणि नेर पोलीस ठाण्याच्या हद्दीत येणाºया मांगलादेवी बिटाची जबाबदारी सांभाळणारे मंगलसिंग बालसिंग चव्हाण हे मूळचे वाशिम जिल्ह्याच्या भुली गावचे. दिग्रसच्या अंबिकानगरात मुंगसाजी महाराज मंदिर बांधण्यात त्यांचे मोठे योगदान आहे. महाराज म्हणून त्यांची सर्वत्र ओळख झालेली. कीर्तनाचे सूर कानी पडताच मंगलसिंग त्यात रममान होतात. व्यसनमुक्त समाजासाठी त्यांची धडपड सुरू आहे. ड्यूटी संपली की त्यांची पावलं मंदिराच्या दिशेने वळतात. तेथे त्यांचा प्रबोधनाचा पाठ सुरू होतो.गरिबांना मदत करा, गोमातेचे संरक्षण करा, व्यसनापासून दूर राहा असा संदेश ते देतात. व्यसनामुळे होणारे नुकसान सांगताना ते अनेक दाखले देतात. आई सोनीबाई यांनी दाखविलेल्या मार्गावर त्यांचा प्रवास सुरू आहे. पोलीस विभागात माहूर, नांदेड आदी ठिकाणी त्यांची सेवा झाली आहे. प्रत्येक ठिकाणी काम करताना त्यांनी कर्तव्यासोबतच लोकसेवेलाही तेवढेच महत्त्व दिले आहे. व्यसनमुक्त समाजासाठी त्यांची धडपड आहे.
खाकी वर्दीतला कीर्तनकार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 11, 2017 21:51 IST
समाजाचे आपणही काही देणे लागतो, या भावनेतून वेळात वेळ काढून गावागावात प्रबोधनाचा वर्गच जणू खाकी वर्दीतल्या माणसाने सुरू केला आहे.
खाकी वर्दीतला कीर्तनकार
ठळक मुद्देनेर पोलीस ठाणे : कर्तव्यासोबतच गावागावात प्रबोधन