संकटावर मात : कोरडवाहू शेतात लाखोंचे उत्पादन, सोयाबीन, कापूस अन् तूरही घेतलीप्रदीप राऊत खैरीनोकरीच्या मागे न लागता आणि परिस्थितीवर मात करत खैरी येथील युवकाने शेती उत्पादनात भरारी घेतली आहे. विशाल पुरुषोत्तम राऊत असे या युवकाचे नाव असून त्याच्या शेती उत्पादनाचा आकडा दरवर्षी लाखावरच आहे. यावर्षी तर त्याने १७ एकर कोरडवाहू क्षेत्रात विविध प्रकारच्या उत्पादनातून १३ लाख रुपयांचे उत्पादन घेतले आहे. शेती परवडत नाही, असे म्हणणाऱ्यांसाठी तो प्रेरणास्रोत आहे.राळेगाव तालुक्यातील सर्वात मोठे गाव म्हणून खैरीची ओळख आहे. अशा या गावातील विशालने बारावीनंतर आयटीआय केले. या शिक्षणाच्या भरवशावर नोकरीची वाट न पाहता त्याने शेतीत प्रगती करण्याचा निर्णय घेतला. घरी असलेल्या १७ एकर क्षेत्रात विविध प्रयोग त्याने सुरू केले. कापूस, सोयाबीन, तूर आदी पारंपरिक पिकेच त्याने घेतली. कोरडवाहू शेती असतानाही त्याने घेतलेले उत्पादन आश्चर्यकारकच आहे. गेली दोन वर्षात पावसाचे प्रमाण कमी असतानाही उत्पन्न घेण्यात तो मागे राहिला नाही. २०१४ च्या खरीप हंगामात त्याने १२ लाखांचे उत्पादन घेतले. यावर्षी १३ ते १३.५ लाखांवर हा आकडा पोहोचला. एकरी १५ एकर असे दहा एकर क्षेत्रात त्याने १५० क्विंटल कापसाचे उत्पादन घेतले. सात एकरात ६० क्विंटल सोयाबीन, तर ३५ क्विंटल तुरी घेतल्या. ही किमया त्याला सहज साधता आली नाही. अहोरात्र शेतात मेहनत घेवून त्याने उत्पन्नाचा आकडा मोठा केला आहे. प्रयत्न आणि परिश्रमाची जोड मिळाली तर कुठलीही बाब अशक्य नाही, हे त्याने सिद्ध करून दाखविले आहे.मागील काही वर्षांपासून परिसरातील शेतकरी निसर्गाच्या लहरीपणामुळे कमालीचा अडचणीत आला आहे. त्यातून मार्ग काढताना विविध प्रश्नांना त्यांना तोंड द्यावे लागत आहे. अशाही स्थिती विशाल राऊत याने घेतलेली भरारी कौतुकास्पद आहे.
खैरीतील युवकाची ‘विशाल’ भरारी
By admin | Updated: February 27, 2016 02:55 IST