तक्रार : तहसीलदारांचा अहवाल डीएसओकडेकळंब : तालुक्यातील शरद येथील रॉकेल परवानाधारक वाल्मीक गणपत ठवरे यांच्याविरुद्ध गावातील अनेकांनी तक्रारी दाखल केल्या होत्या. त्यानुसार नायब तहसीलदारांकडून चौकशी करण्यात आली. यात रॉकेल दुकानदार दोषी आढळल्याने त्यांचा परवाना निलंबित करण्यात यावा, असा अहवाल जिल्हा पुरवठा अधिकाऱ्यांकडे तहसीलदार रणजित भोसले यांनी पाठविला आहे.शरद येथील मारोती चिमना कासार यांच्यासह अनेकांनी तक्रारी केल्या होत्या. त्यावरुन नायब तहसीलदार यांनी गावात जाऊन सरपंच पंडित घोटेकार, तुळसा कुंभेकर, कमला कासार, चंद्रमणी मेश्राम, चंद्रकला कासार, प्रल्हाद कासार, रामदास बोरकर, नगाबाई शिवणकर, सुवर्णा किन्हेकर आदींचे बयाण नांदविले. या सर्वांनी आपल्या बयाणात कार्डधारकांशी अरेरावी करणे, उद्धट व अश्लिल शिवीगाळ करणे, वारंवार रेशनकार्ड बदलविण्यास सांगणे, रॉकेल देण्यास टाळाटाळ करणे, याचा उल्लेख केला. तसेच १ हजार ३३५ लिटर रॉकेल शिल्लक असताना काही शिधापत्रिकाधारकांना रॉकेल देण्यात आले नाही, ही बाब उघड झाली. त्यामुळे गावातील शांतता भंग होण्याची शक्यता असून कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे संबंधितांचा परवाना निलंबनाची शिफारस करण्यात आली आहे.वाल्मीक ठवरे यांनी जुलै व आॅगस्टचे मिळून २ हजार ८० लिटर रॉकेलची उचल केली. त्यानंतर त्यांनी १ सप्टेंबर रोजी १ हजार ३३५ लिटर रॉकेल शिल्लक असल्याचे सांगितले. त्यामुळे सप्टेंबर व आॅक्टोबरकरिता रॉकेल मंजूर करू नये, असे त्यांनी कळविले. विशेष म्हणजे, यापूर्वी कधीही रॉकेल शिल्लक असल्याचे कळविण्यात आले नाही. तक्रारीवरून झालेल्या चौकशीनंतरच रॉकेल कसे काय शिल्लक राहीले, याचीही चौकशी केल्यास मोठे घबाड बाहेर येण्याची शक्यता आहे. (तालुका प्रतिनिधी)
शरद येथील रॉकेल परवाना निलंबित होणार
By admin | Updated: October 21, 2016 02:21 IST