उमरखेड (कुपटी) : २५ वर्षांपासून तालुक्यातील सुकळी (जा) या गावालगत कपाडी तलाव निर्माण करून या भागातील पिण्याचा व सिंचनाचा प्रश्न कायमस्वरूपी सोडविण्यासाठी संघर्ष समितीचा संघर्ष सुरू आहे. त्याला तत्काळ मान्यता देण्यात यावी, अन्यथा सात गावचे नागरिक नागपूर येथे विधान भवनासमोर १९ डिसेंबरला आत्मदहन करतील, असा इशारा संबंधित नागरिकांनी मुख्यमंत्र्यांना पाठविलेल्या निवेदनातून दिला आहे.या इशाऱ्यामुळे प्रशासनात एकच खळबळ माजली आहे. सुकळी गावापासून काही अंतरावर कपाडी तलाव निर्माण करावा, अशी मागणी आहे. सुकळीसोबतच बोथा, चिल्ली, दहागाव, नागेशवाडी, आमनपूर, वरुड बिबी या सात गावातील नागरिकांनी एकत्र येवून कपाडी तलाव संघर्ष समितीची स्थापना केली. तेव्हापासून आजपर्यंत या मागणीसाठी रास्ता रोको, उपोषण, मोर्चे, निवेदने अशी अनेक आंदोलने केली. परंतु प्रशासनाने या गंभीर प्रश्नाकडे कधीही लक्ष दिले नाही. दिवसेंदिवस या सातही गावातील पाण्याची पातळी कमी होत आहे. या भागातील हजारो हेक्टर शेती सिंचनापासून वंचित आहे. तसेच गावात पाणीटंचाईदेखील तीव्र प्रमाणात आहे. गेल्या २५ वर्षांपासून उमरखेड युवक काँग्रेसचे अध्यक्ष डॉ.दशरथ वानखडे यांच्या नेतृत्वात तलाव संघर्ष समितीने सतत संबंधित आमदार, खासदार, जलसंपदा मंत्री व मुख्यमंत्र्यांकडे जावून या प्रश्नाचा पाठपुरावा केला. परंतु त्याची दखल घेण्यात आली नाही. हा संषर्घ सुरू असतानाच डॉ.वानखडे यांचे अपघाती निधन झाले. परंतु त्यानंतरही गावकऱ्यांनी त्यांच्या पत्नी संगीता वानखडे यांना तलाव संघर्ष समितीच्या अध्यक्षपदी नियुक्त करून हा लढा अधिक तीव्र केला. काही दिवसांपूर्वीच उमरखेडचे आमदार राजेंद्र नजरधने यांनी संघर्ष समितीच्या पदाधिकाऱ्यांची नागपूर येथे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांची भेट घालून दिली. त्यावेळी हा प्रश्न निकाली न निघाल्यास १९ डिसेंबरला या सातही गावातील नागरिक आत्मदहन करणार असल्याचा इशारा नागरिकांनी दिला. तसेच अकोला पाटबंधारे विभाग, जिल्हाधिकारी यवतमाळ, लघु सिंचन व जलसंधारण आदी संबंधित विभागांना या बाबतचे निवेदन देण्यात आले आहे. त्यामुळे शासनाने हा प्रश्न त्वरित निकाली न काढल्यास नागपूर येथे आत्मदहन करणारच, असे संघर्ष समितीचे अध्यक्ष संगीता वानखडे यांनी ‘लोकमत’ला सांगितले. (वार्ताहर)
कपाडी तलाव मंजूर करावा
By admin | Updated: December 18, 2014 02:28 IST