वणी : उशीरा आलेला पाऊस, त्यानंतर मारलेली दडी, परतीच्या पावसाने दिलेला दगा, पावसाअभावी उदभवलेली दुबार-तिबार पेरणीची परिस्थिती, यामुळे यावर्षी कापूस, सोयाबिनसह सर्वच शेतमालाच्या उतारीत घट आली आहे. परिणामी येथील कृषी उत्पन्न बाजार समितीत शेतमालाची आवकही प्रचंड मंदावली आहे. बाजार समितीत अद्यापही शुकशुकाट दिसून येत आहे. यावर्षी रोहिणी, मृग नक्षत्रापासून पावसाने दडी मारली. नंतर दोन दिवस संततधार पाऊस कोसळला. त्या दोनच दिवसांत तब्बल ३५ मिलीमीटर पाऊस पडला होता. त्यामुळे शेतात ओलावा आला होता. तरीही मृगात केलेली पेरणी वाया गेली होती. बहुतांश शेतकऱ्यांवर दुबार-तिबार पेरणीचे संकट ओढवले होते. त्यामुळे शेतकऱ्यांचा जीव टांगणीला लागला होता. प्रथम बियाणे पेरल्यानंतर मोड आल्याने शेतकरी आर्थिक संकटात सापडले होते. सरतेशेवटी वणी तालुक्यात ४१ हजार ४९४ हेक्टरवर कपाशी, सात हजार ५९ हेक्टरवर सोयाबीन, पाच हजार ४४६ हेक्टरवर तूर, तर ५७८ हेक्टरवर ज्वारीची पेरणी झाली होती. तथापि यापैकी तब्बल २८ हजार ९३३ हेक्टवर शेतकऱ्यांना दुबार-तिबार पेरणी करावी लागली होती. शेतकऱ्यांनी कपाशीसह २३५ हेक्टरवर सोयाबीन, दोन हजार २५५ हेक्टरवर तूर, तर ७३ हेक्टरवर ज्वारीची दुबार-तिबार पेरणी केली होती. पावसाअभावी दुबार आणि तिबार पेरणीच्या संकटाला सामोरे जावे लागलेल्या शेतकऱ्यांच्या कष्टाला मात्र तरीही यश आल्याचे दिसत नाही. प्रचंड मेहनत करून, काबाडकष्ट करून, कर्ज काढून शेतकऱ्यांनी दुबार-तिबार पेरणी करूनही हाती काहीच येत नसल्याने बळीराजा यावर्षी घायाकुतीस आला आहे. त्यातच पुन्हा परतीच्या पावसाने दगा दिला. परिणामी जमिनीतील ओलावा कमी झाला अन् शेतातील उभ्या पिकांवर विविध रोगांनी आक्रमण केले. त्यामुळे फवारणीचा खर्चही प्रचंड वाढला. एवढा सर्व आटापिटा करूनही उत्तारा कमी आल्याने शेतकरी प्रचंड हादरून गेले आहेत. कपाशी आणि सोयाबिनचा उतारा कमी आल्याने बाजार समितीतीही शुकशुकाट दिसून येत आहे. मागीलवर्षी नोव्हेंबर महिन्याच्या मध्यापर्यंत बाजार समितीत वर्दळ वाढली होती. मात्र यावर्षी ही वर्दळ प्रचंड प्रमाणात रोडावली आहे. कापूस, सोयाबीन, तूर, ज्वारी आदी पिकांची आवक मंदावली आहे. त्यातच दरही योग्य मिळत नसल्याने बळीराजा पुरता हवालदिल झाला आहे.यावर्षी आजपर्यंत येथील कृषी उत्पन्न बाजार समितीत केवळ २७ हजार ४५८ क्विंटल कापूस, सहा हजार २२९ क्विंटल सोयाबीन, ११३ क्विंटल चना, ७६ क्विंटल तूर, तर ४८ क्विंटल गहू खरेदी करण्यात आल्याची माहिती बाजार समितीचे सचिव अशोक झाडे यांनी दिली. वणीसह समितीचा शिंदोला आणि नवरगाव येथे उपबाजार आहे. या तिनही ठिकाणी मिळून एवढाच शेतमाल बाजार समितीत आला आहे. त्यावरूनच यावर्षी शेतमालाची आवक मंदावल्याचे स्पष्टपणे दिसून येत आहे. (कार्यालय प्रतिनिधी)
बाजारात आवक मंदावली
By admin | Updated: November 19, 2014 22:49 IST