यवतमाळ : अतिरिक्त शिक्षकांचे वेतन अदा करण्यासह विविध मागण्यांसाठी शनिवारी शिक्षकांनी माध्यमिक शिक्षणाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन केले. विदर्भ माध्यमिक शिक्षक संघाच्या नेतृत्वात यावेळी अनेक शिक्षकांनी आंदोलनात सहभाग घेतला. खासगी माध्यमिक शाळेतील अतिरिक्त ठरलेल्या अनेक शिक्षकांचे अद्यापही समावेशन होवू शकलेले नाही. त्यातच त्यांचे वेतन थांबविण्यात आले आहे. तसेच त्यांना रुजू करण्यास नकार देणाऱ्या शाळांमधील सर्व कर्मचाऱ्यांचेही वेतन अडविण्यात आले आहे. ते सुरळीत करण्याच्या मागणीसाठी विमाशिचे प्रांतीय उपाध्यक्ष अरविंद देशमुख, विभागीय कार्यवाह एम.डी. धनरे, रामकृष्ण जीवतोडे यांच्या नेतृत्वात धरणे देण्यात आले. राज्यातील शिक्षण क्षेत्रातील कर्मचाऱ्यांना सातवा वेतन आयोग लागू करा, १९ नोव्हेंबरचे जाचक परिपत्रक रद्द करून कोणत्याही शिक्षकाचे वेतन थांबवू नका, शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना लागू करा, संचमान्यतेचा २८ आॅगस्ट २०१५ चा जाचक शासन निर्णय रद्द करून सर्वसमावेशक शासन निर्णय निर्गमित करावा अशा विविध मागण्या यावेळी करण्यात आल्या. मागण्यांचे निवेदन उपशिक्षणाधिकारी रोहणे यांना सुपूर्द करण्यात आले. (स्थानिक प्रतिनिधी)
विमाशिचे धरणे आंदोलन
By admin | Updated: January 8, 2017 01:02 IST