उमरखेड : अमरावती परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक संजीवकुमार सिंघल यांनी गुरुवारी येथे भेट देऊन कायदा व सुव्यवस्थेचा आढावा घेतला. यावेळी शांतता समितीची बैठकही घेण्यात आली. बैठकीला आमदार राजेंद्र नजरधने, माजी आमदार प्रकाश देवसरकर, जिल्हा पोलीस अधीक्षक अखिलेशकुमार सिंह, उपविभागीय अधिकारी दीपक सिंघला, उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ. अश्विनी पाटील, तहसीलदार सचिन शेजाळ, ठाणेदार शिवाजी बचाटे उपस्थित होते. उमरखेडच्या इतिहासात महानिरीक्षक दर्जाच्या पोलीस अधिकाऱ्याने भेट देण्याची ही पहिलीच वेळ आहे. सण-उत्सवात शांतता, सामाजिक सलोखा कायम राखा असे आवाहन करताना महानिरीक्षक सिंघल यांनी सामाजिक तेढ निर्माण करणाऱ्या घटकांवर कठोर कारवाई केली जाईल, असे स्पष्ट केले. यावेळी मान्यवरांसह शांतता समितीच्या अनेक सदस्यांनी आपले विचार मांडले. उत्सव आनंदाने साजरा करा, मात्र कुणालाही त्रास होणार नाही याची जाणीव ठेवा, असे आवाहन पोलीस अधीक्षकांनी केले. तर सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी अवास्तव खर्च टाकून दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांसाठी मदतीच्या योजनांचा विचार करावा, असे आवाहन आमदार नजरधने यांनी केले. या बैठकीला सर्वच प्रमुख पदाधिकाऱ्यांची उपस्थिती होती. (शहर प्रतिनिधी)
पोलीस महानिरीक्षकांनी दिली उमरखेडला भेट
By admin | Updated: September 12, 2015 02:20 IST