विधान परिषद : ‘गुलाबी’ कागदाचा धसकायवतमाळ : विधान परिषदेच्या शनिवारी होऊ घातलेल्या मतदानाच्या वेळी केंद्रावर मतदारांची आत येताना आणि बाहेर जाताना अशा दोनही वेळी कसून तपासणी केली जाणार आहे. जिल्हा निवडणूक सनियंत्रण अधिकारी सचिंद्र प्रताप सिंह यांनी संबंधित यंत्रणेला या संबंधीचे आदेश दिले आहेत. एवढेच नव्हे तर तपासणीची मार्गदर्शक तत्वेही जारी केली. मतदान केंद्रात ‘गुलाबी’ कागद नेण्याच्या व्यूहरचनेच्या पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासनाने ही खबरदारी घेतली आहे.काँग्रेस व शिवसेना या दोनही पक्षाच्या उमेदवारांनी आपल्या उमेदवारांना ‘पक्के’ केले आहे. त्यानंतरही त्यांनी आपल्यालाच पहिल्या ‘पसंती’चे मत दिले की नाही, याची खातरजमा त्यांना करायची आहे. त्यासाठी २०१० च्या विधान परिषद निवडणुकीतील गुलाबी कागदाचा पॅटर्न वापरण्याचे नियोजन एका उमेदवाराच्या पाठीराख्यांनी केले होते. ‘लोकमत’ने १६ नोव्हेंबर रोजी या संबंधीचे वृत्त प्रकाशित केले होते. त्यामुळे पाठीराख्यांचे नियोजन ऐनवेळी कोलमडले. त्याच वेळी प्रशासनही आणखी सतर्क झाले. गुलाबी कागदाचा फंडा हाणून पाडण्यासाठी मतदान केंद्रावर खास खबरदारी घेतली जाणार आहे. कोणत्याही मतदाराला मोबाईल, पेन किंवा अन्य कोणतीही वस्तू मतदानाच्या वेळी सोबत नेता येणार नाही. मतदानासाठी अर्थात ‘पसंतीक्रम’ नोंदविण्यासाठी मतदाराला तेथे केंद्राधिकाऱ्याकडून विशिष्ट पेन पुरविला जाणार आहे. मतदाराची आत शिरताना आणि मतदान करून बाहेर पडताना तपासणी केली जाणार आहे. याशिवाय मतदारांसाठी आणखी काही खबरदारीच्या सूचना प्रशासनाने केल्या आहेत. प्रशासनाच्या या सतर्कतेने गुलाबी कागदाचा फंडा फेल होण्याचे चित्र दिसत आहे. (जिल्हा प्रतिनिधी)
मतदारांची केंद्रावर दोन वेळा तपासणी
By admin | Updated: November 19, 2016 01:26 IST