लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : कोरोनाचा उद्रेक होताच पहिल्या टप्प्यात सॅनिटायझरचा अमाप वापर झाला. दर दिवसाला किमान १७ हजार ५०० बाॅटल्स विकल्या जात होत्या. आता दर दिवसाला १५० ते २०० सॅनिटायझर बाॅटल विकल्या जात आहेत. यातून नागरिकांमध्ये सॅनिटायझरच्या बाबतीत उदासीनता दिसून येते. महाराष्ट्रात कोरोनाची दुसरी लाट आल्याचा निर्वाळा आरोग्य विभागाने जाहीर केला आहे. आरोग्यमंत्र्यांच्या सूचनेनंतर नागरिकांनी स्वत:ची खबरदारी घेण्याची नितांत गरज आहे. कोरोनाचे रुग्ण एकीकडे वाढत आहे. दुसरीकडे नागरिक बिनधास्त झाले आहेत.सॅनिटायझर काहीतरी बनवेगिरी आहे, असा समज पसरला आहे. मुळात सॅनिटायझरचा कितीवेळा वापर करावा याची माहिती अनेकांना नाही. पूर्वीच्या तुलनेत सुरक्षित सॅनिटायझर बाजारात आले आहे. मात्र, त्याची विक्री मोठ्या प्रमाणात घटली आहे. यातून रुग्णांची संख्या वाढत आहे. अशा स्थितीत प्रत्येकाने स्वत:ची काळजी स्वत: घेणे गरजेचे झाले आहे.
एकवेळा हाताला सॅनिटायझर लावल्यावर ते ३० ते ४५ मिनिट काम करते. याचा अवेअरनेस अनेकांना नाही. याच्यात जाणीवजागृती झाली नाही. यामुळे प्रत्येक मिनिटाला सॅनिटायझर हाताला लावण्यात आले. यातून हाताला इजा झाली.- पंकज नानवाणी, अध्यक्ष,केमिस्ट अँड ड्रगिस्ट असोसिएशन
९० टक्के विक्री घटली
कोरोनाचा प्रकोप दिवसेंदिवस वाढत आहे. याच सुमारास नागरिकांकडून कोरोनाच्या नियमांची पायमल्ली होताना दिसत आहे. नागरिक वारंवार हात धुवून थकले आहेत. यामुळे सॅनिटायझरचा वापर घटला आहे.
पूर्वी नागरिकांना कोरोनाची फार भीती वाटत होती. आता प्रकोप वाढल्यानंतरही ही भीती कमी झाली आहे. हाताला सॅनिटायझर लावले नाही तरीही कोरोना इफेक्ट करत नाही, असा गैरसमज पसरला आहे.
सर्वसामान्य नागरिकांना सॅनिटायझर विकत घेणे परवडत नाही. यामुळे नागरिक सॅनिटायझरचा वापर करत नाहीत. याशिवाय याला पर्याय असलेल्या साबणाचाही वापर होत नाही. यातून असुरक्षितता अधिक वाढली आहे.
सॅनिटायझरच्या अति वापराने हाताला ॲलर्जी झाल्याचे प्रकार पुढे आले आहेत. अनेकांच्या हाताला पुरळ आले, तर अनेकांची स्कीन यामुळे प्रभावित झाली आहे. यातून नागरिकांनी सॅनिटायझरचा वापर टाळला आहे.
सर्वसामान्य नागरिकांच्या प्रतिक्रिया
सॅनिटायझरचा वापर आम्ही करत नाही. सर्वसाधारण माणसांना तो परवडणारा नाही. अनेकांना त्यावर विश्वास नाही. मात्र, मी स्वत: स्वच्छ पाण्याने हात वारंवार धुते. प्रत्येकाने स्वत:ची काळजी घेण्याची गरज आहे.- प्रमाेदिनी रामटेके, यवतमाळ
पूर्वी दिवसभरात १० ते १२ वेळा सॅनिटायझरने हात धुतले जात होते. मध्ये पेशंट कमी झाले. यामुळे हात धुण्याची सवय कमी झाली. आता लस आली. यामुळे सॅनिटायझर वापर होत नाही. मात्र, सुरक्षितता बाळगणे गरजेचे आहे.- सतीश कांबळे, यवतमाळ