रूपेश उत्तरवार लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : घरगुती सिलिंडरच्या किमती सर्वसामान्य नागरिकांच्या आवाक्याबाहेर गेल्या आहेत. त्यामुळेच दोन वर्षांपूर्वी मोठ्या उत्साहाने गॅस सिलिंडर घरी आणलेली शेकडो कुटुंबे आता स्वयंपाकासाठी चुलीकडे वळली आहेत. ‘लोकमत’ने यवतमाळ तालुक्यातील वाघाडी आणि जांबमध्ये याबाबत आढावा घेतला असता गावातील सुमारे ८० टक्के घरात गॅस सिलिंडर आहे. मात्र, मागील काही महिन्यांत ४० टक्के कुटुंबांनी सिलिंडरचा वापर थांबविल्याचे विदारक चित्र पुढे आले. घरोघरी गॅस पोहोचविण्याच्या उद्देशाने केंद्र शासनाने उज्ज्वला योजना राबविली. याअंतर्गत १०० रुपयांमध्ये अनुसूचित जाती जमाती आणि दारिद्र्य रेषेखालील कुुटुंबांना गॅस कनेक्शन जोडणी देण्यात आली. त्यानंतर ही जोडणी मोफत करण्यात आली. मात्र, गॅस कनेक्शन मिळाले तरी सिलिंडर मात्र विकत घ्यावे लागते आणि याच सिलिंडरच्या किमती भरमसाठ वाढल्याने उज्ज्वला योजनेचा बोजवारा उडाला असून, योजनेबाहेरील कुटुंबालाही १०३३ रुपयांचे सिलिंडर घेणे परवडेनासे झाले आहे. यवतमाळ जिल्ह्यात सहा लाखांवर कुटुंबे गॅस सिलिंडरचा वापर करतात. या कुटुंबाचा केरोसीन पुरवठा बंद करण्यात आला. आता सिलिंडर परवडत नाही आणि केरोसीन मिळत नाही, अशी स्थिती झाल्याने अनेक ग्रामस्थ सरपणाकडे वळले आहेत. वाघाडी आणि जांबमध्ये गॅस सिलिंडरचा वापर थांबविलेल्या कुटुंबाशी संवाद साधला असता हजार रुपयांचे सिलिंडर घेणे आवाक्याबाहेरचे आहे. त्यामुळे चुलीकडे वळल्याचे त्यांनी सांगितले.
जिल्ह्यात ४० हजार सिलिंडरची झाली कपात - जिल्ह्यात सहा लाखांवर गॅस कनेक्शन असून, त्यात २ लाख ८५ हजार कुटुंबांकडे उज्ज्वला योजनेतून मिळालेल्या गॅस सिलिंडरचा वापर होतो. मात्र मागील काही महिन्यांत महागाईने सर्वसामान्य नागरिक त्रस्त झालेला आहे. त्यातच सिलिंडरच्या दरात भरमसाठ वाढ झाल्याने जिल्ह्यातील तब्बल ४० हजार कुटुंबांनी गॅस सिलिंडरचा वापर थांबविला असल्याचे पुढे आले आहे. सिलिंडरची किमत १०३३ आहे. शिवाय ग्रामीण भागात घरापर्यंत सिलिंडर आणण्यासाठी इतर रक्कम मोजावी लागत असल्याने अनेकांनी आपला मोर्चा सरपणाकडे वळविला आहे.
होय मागणी घटली
गॅस एजन्सीमार्फत यवतमाळ तालुक्यातील शंभर गावामध्ये महिन्याला आठ हजार सिलिंडर पाठविले जात होते. सिलिंडरच्या किमती वाढत गेल्याने आता दर महिन्याला पाच ते साडेपाच हजार सिलिंडरचीच मागणी आहे. ग्रामीण भागातील अनेकांनी वाढत्या महागाईमुळे सिलिंडरचा वापर थांबविला आहे. इतर एजन्सीच्या कार्यक्षेत्रातही सिलिंडर मागणीत घट दिसते. - मिलिंद धुर्वेगॅस एजन्सी चालक, यवतमाळ.
गोरगरिबांचा विचार करा सिलिंडरचे दर वाढले आहेत. आमच्या घरात मजुरी करणारा एकच सदस्य आहे. एवढा मोठा खटला कसा चालवायचा, हाच प्रश्न आहे. घरी सिलिंडर आहे, पण स्वयंपाक करण्यासाठी ते वापरता येत नाही. असलेले सिलिंडर संपल्याने ते भरण्यासाठी पैसेच नाहीत. सरकारने गोरगरीब जनतेचा विचार करावा. - वच्छला उमाटे, जांब
पाहुणे आले तरच सिलिंडरचा वापर आमचे मोठे कुटुंब आहे. एका सिलिंडरवर महिनाभराचा स्वयंपाकही होत नाही. केवळ पाहुणे आले तरच आम्ही त्याचा वापर करतो. नाही तर शेतातून आणलेल्या फणावर स्वयंपाक केला जातो. तुऱ्हाटी, पऱ्हाट्या उन्हाळ्यात जमा केल्या आहे. त्याच्यावर आता गुजराण सुरू आहे. - दुर्गा ठाकरे, वाघाडी
जळतणावरच करतो स्वयंपाक सिलिंडर पुरला पाहिजे म्हणून चुलीवर स्वयंपाक करतो. बजेट लागल्यानंतरच सिलिंडर आणण्याचा विचार येतो. जंगलातून जळतण आणून त्याच्यावरच स्वयंपाक करते. आमच्यासारख्या गरिबांना सिलिंडर कुठे परवडतो. १ हजार रुपयांच्या वर सिलिंडर गेले आहे. इतक्या पैशात किराणा होतो. - अन्नपूर्णा मडावी, जांब
सबसिडीही गायब झाली आमच्या गावात सिलिंडर गॅसची संख्या मोठी आहे. मात्र, आता केवळ २० टक्के लोकच नियमितपणे सिलिंडर भरून आणत आहेत. सिलिंडरच्या दरवाढीने प्रत्येकाला गॅसवर स्वयंपाक करणे शक्य होत नाही. सबसिडी देखील कमी झाली आहे. पूर्वी कमी पैशात सिलिंडर मिळत होते. तसेच दर असावेत. - सोनाली टिचुकले, सरपंच जांब