मारेगाव : येथील पंचायत समितीअंतर्गत कुंभा ग्रामपंचायतीचे विभाजन करून इंदिराग्राम (श्रीरामपूर) या नवनिर्मित ५७ व्या ग्रामपंचायतीची निर्मिती करण्यात आली. या ग्रामपंचायतीच्या कार्यालयाचे उद्घाटन तब्बल सहा महिन्यांच्या विलंबाने पार पडले.कोलाम बांधवांच्या प्रखर आंदोलनातून १९९४ मध्ये महसुली गावाचा दर्जा प्राप्त झालेली सदर दोनही गावे १९९८ पासून स्वतंत्र गट ग्रामपंचायत स्थापनेच्या प्रतीक्षेत होती़ या संदर्भात कुंभा ग्रामपंचायतीमार्फत चार वेळा प्रस्ताव प्रशासनाकडे दाखल करण्यात आले़ दैनिक ‘लोकमत’ने सातत्याने हा प्रश्न उचलून धरला़ गेल्या १४ वर्षांच्या कालावधीत तब्बत ४९ बातम्या ‘लोकमत’मधून प्रकाशित झाल्या़ अखेर जिल्हा परिषद प्रशासन व शासनाला जाग आली आणि कुंभा ग्रामपंचायतीचे विभाजन करून इंदिराग्राम येथे नवीन ग्रामपंचायत स्थापेनला हिरवी झेेंडी मिळाली़ ग्रामविकास मंत्रालयातून यवतमाळ जिल्हा परिषदेला १८ जानेवारी २०१४ रोजी सदर ग्रामपंचायत स्थापन झाल्याचे पत्र मिळाले. जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी येथील गटविकास अधिकाऱ्यांना पत्र देऊन तत्काळ कारवाई करण्याचे निर्देश दिले़ ग्रामपंचायतीसाठी प्रशासकांची नियुक्तीसुध्दा झाली़ तथापि ग्रामपंचायतीचे दप्तर विभागणी व कार्यालय स्थापण्यास दिरंगाई होत होती. याबाबत जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ़मल्लीनाथ कलशेट्टी यांच्या निदर्शनास तंटामुक्ती अध्यक्षांनी ही बाब आणून दिली. त्यांनी तत्काळ मुहूर्त शोधून स्थानिक अंगणवाडी केंद्रात ग्रामपंचायत कार्यालयाचा फलक लावून कार्यालयाचे उद्घाटन केले. मात्र कार्यालयाच्या उद्घाटनाला कुंभाचे माजी सरपंच किंवा ग्रामपंचायतीच्या स्थापनेसाठी अविरत धडपडणाऱ्यांना विश्वासात न घेतल्याची खंत कार्यक्रमास्थळी व्यक्त करण्यात आली.याप्रसंगी आयोजित कार्यक्रमाला आमदार वामनराव कासावार, जिल्हा परिषद सदस्य नरेंद्र ठाकरे, पंचायत समिती सदस्य गजानन खापने, नानाजी खंडाळकर, वेणूताई काटवले, अॅड.राजीव कासावार, राकेश खुराणा, विनोद गाणार, दुष्यंत जयस्वाल, रामदास घोटेकर, पोडातील ज्येष्ठ नागरिक सुरबाजी आत्राम, पंजाब रामपुरे मंचावर उपस्थित होते़ ठाकरे यांनी गावातील पाणीपुरवठा, राजीव गांधी भवनाची जागा, सर्व कोलाम पोडांना जोड रस्ते, तसेच ग्रामपंचायत पेसाअंतर्गत समाविष्ट करण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करणार असल्याचे सांगितले. संचालन कुंभा तंटामुक्त गाव समितीचे अध्यक्ष अण्णाजी कचाटे यांनी केले़ त्यानंतर झालेल्या पहिल्याच ग्रामसभेत ग्रामविकास, निवडणुकीसह विविध विषयांवर चर्चा होऊन आवाजी मताने ठराव पारित करण्यात आले. ग्रामसभेचे संचालन पंचायत विस्तार अधिकारी पी़एम़पंडित यांनी केले़ सभेला ग्रामपंचायतीअंतर्गत येणाऱ्या सहाही पोडातील नाईक, महाजनसह ग्रामस्थ उपस्थित होते. (तालुका प्रतिनिधी)
इंदिराग्राम गट ग्रामपंचायत अस्तित्वात
By admin | Updated: August 14, 2014 23:56 IST