अहवाल सादर होणार : उमरखेड वनपरिक्षेत्रातील अवैध वृक्षतोडउमरखेड : वनपरिक्षेत्राच्या पिरंजी बीटमध्ये उघडकीस आलेल्या २० लाख रुपयांच्या सागवान कत्तलीचा अहवाल मुख्य वनसंरक्षकांनी तातडीने मागविला असून हा अहवाल प्राप्त होताच दोषी वन अधिकाऱ्यांवर कारवाई होण्याचे संकेत आहे. त्यामुळे उमरखेड वन अधिकारी व कर्मचाऱ्यांत एकच खळबळ उडाली आहे.कृष्णापूर जंगलात २५० पेक्षा अधिक वृक्षांची अवैध कत्तल करण्यात आली होती. कृष्णापूर बीटमध्ये कक्ष ४६५, ४६६ तर पार्डी बीट कक्ष क्र.४५४, ४५६ मध्ये वृक्षतोड झाली आहे. कृष्णापूरमधील या सागवानाची किमत सुमारे २० लाख रुपये सांगितली जाते. ही वृक्षतोड दडपण्याचे प्रयत्न टॉप टू बॉटम सुरू आहे. तसेच डमी आरोपी दाखविण्याचा प्रयत्नही केला जात आहे. जप्तीत दाखविण्याचे व कारवाई केल्याचे भासविले जात आहे. या प्रकरणात वनरक्षक सी.व्ही. जाधव यांना तत्काळ निलंबित करण्यात आले. ही कारवाई जोरात सुरू असल्याने वन अधिकाऱ्याकडून दाखविले गेले. परंतु सदर प्रकरणाची गंभीर दखल वनमंत्रालयाकडून घेतली गेली. त्यामुळे चौकशीला गती आली. यवतमाळ दक्षता विभागाचे केशव वाभळे व पुसद येथील भरारी पथक प्रमुख के.पी. धुमाळे, पुसदचे उपवनसंरक्षक कमलाकर धामगे यांनी जंगलात सखोल चौकशी केली. जवळपास पाच दिवस जंगल पिंजून काढले. २८ सप्टेंबरच्या सायंकाळी ५ ते रात्री ८ वाजेपर्यंत जवळपास तीन तास उमरखेड उपविभागीय वन कार्यालयात तळ ठोकून होते. त्यांनी पिरंजी बीटमधील सर्व कागदपत्रांची तपासणी केली. त्याचबरोबर या प्रकरणात निलंबित वनरक्षक जाधव यालाही यावेळी सदर प्रकरणाबाबत प्रश्न विचारण्यात आले.या प्रकरणात काही वन अधिकाऱ्यांना वाचविण्याचा आटोकाट प्रयत्न केला जात आहे. त्यामुळेच निलंबित वनरक्षक जाधव यांच्याकडून काही लिहून घेण्याचा प्रयत्न केला. परंतु जाधव यांनी लेखी देण्यास नकार दिल्याचे समजते. तसे लिहून घेण्यासाठी वरिष्ठांकडून दबाव टाकला गेल्याची वनवर्तुळात चर्चा आहे. परंतु सर्व अधिकाऱ्यांचे ऐकून घेतल्यानंतर कुठल्याही कागदावर स्वाक्षरी करायला व लेखी देण्यास निलंबित वनरक्षक जाधव यांनी स्पष्ट नकार दिल्याचे समजते. यावरून आजही पिरंजीप्रकरणात अधिकाऱ्यांना वाचविण्याचे जोरदार प्रयत्न चालू असल्याचे समजते. आता पिरंजी जंगलातील सागवान प्रकरणाचा अहवाल मुख्य वनसंरक्षकाकडे सादर केला जाईल. त्यानंतर दोषी असणाऱ्यांवर कारवाई केली जाणार आहे. (शहर प्रतिनिधी)
दोषी वन अधिकाऱ्यांवर कारवाईचे संकेत
By admin | Updated: October 1, 2015 02:27 IST