मारेगाव : सुशिक्षित व नोकरदारांचे कुटुंब असलेले प्रभाग म्हणून येथील क्रमांक पाच व सहाची ओळख आहे. या दोनही प्रभागातून राष्ट्रीय पक्षांचे प्रमुख पुढारी उमेदवार असून सर्वच पक्षांनी या प्रभागातील निवडणूक प्रतिष्ठेची केली. सुशिक्षित मतदारांचा जादा भरणा असल्याने या दोनही प्रभागात आता चांगलीच चुरस निर्माण झाली आहे. प्रभाग क्रमांक पाचमध्ये शहरातील राष्ट्रीय शाळेच्या मागील व पुढील वस्तीचा समावेश होतो. या दोन्ही कॉलनीत नोकरदार व व्यावसायीक कुटुंबाचा भरणा जादा आहे. हा प्रभाग सर्वसाधारण असल्याने अनेकांनी या प्रभागातून पक्षांकडे उमेदवारी मागितली होती. मात्र उमेदवारी न मिळाल्याने अखेर नाराजांनी बंडखोरी केली. या प्रभागात एकूण ३५३ मतदार असून त्यात १६७ महिला, तर १८६ पुरूष मतदार आहेत. कुणबी समाजाची एकगठ्ठा ११७ मते या प्रभागात आहे. हीच मते निर्णायक ठरणार आहे. या प्रभागात १० उमेदवार रिंगणात आहे. शहरातील प्रभाग क्रमांक ६ हा प्रभाग नव्याने बनलेली वसाहत आहे. हा प्रभाग अनुसूचित जमातीसाठी आरक्षित आहे. त्यामुळे अनेक पक्षांना दुसऱ्या प्रभागातील सक्षम उमेदवार आयात करावे लागले आहे. या प्रभागातसुद्धा नोकरदारांची संख्या लक्षणीय आहे. एकूण ४५५ मतदार असून त्यात २३१ महिला, तर २२४ पुरूष मतदार आहेत. या प्रभागात अनुसूचित जमातीचे ७६, अनुसूचित जातीचे ३३, मुस्लीम २८ व ओबीसींची ३१८ मते आहे. प्रभाग क्रमांक सातमध्ये पंचायत समितीच्या मागील भागाचा समावेश होतो. या प्रभागात ३७९ मतदार आहे. यामध्ये महिला मतदार १८९, तर पुरूष मतदार १९८ आहे. या प्रभागात कामगारांची संख्या जादा आहे. या प्रभागात समस्यात जास्त असल्याने विकास करणाऱ्या उमेदवारांकडे मतदाराचा कल राहण्याची शक्यता आहे. हा प्रभाग नामप्रसाठी राखीव आहे. प्रभाग क्रमांक आठमध्ये पोलीस ठाण्याच्या मागील भागाचा समावेश आहे. या प्रभागात एकूण ३१५ मतदार आहेत. त्यात महिला मतदार १५१, तर पुरूष मतदार १५४ आहे. हा प्रभाग अनुसूचित जमाती महिलांसाठी राखीव आहे. या प्रभागातून सहा महिला उमेदवार रिंगणात आहेत. या प्रभागातही समस्या मोठ्या असून विकास करणाऱ्या उमेदवारांना मतदारांची पसंती राहण्याची शक्यता आहे. या प्रभागात जातीचे समीकरण चालणार नसल्याने विजयाची संधी सर्वांनाच आहे. या प्रभागात राष्ट्रीय पक्ष वरचढ आहेत. (शहर प्रतिनिधी)
सुशिक्षित मतदारांमुळे वाढली चुरस
By admin | Updated: October 25, 2015 02:31 IST