यवतमाळ : जिल्हा परिषद शाळांमध्ये इंग्रजी शिकविली पाहिजे. शाळांची गुणवत्ता वाढली तर पटसंख्याही वाढेल. वेगळेपण निर्माण केले तरच विद्यार्थी वाढतील. त्यासाठी शिक्षकांनी शाळांच्या उपक्रमांमध्ये समाजाचा सहभाग वाढवावा, असे आवाहन जिल्हा परिषद अध्यक्ष डॉ. आरती फुपाटे यांनी केले.शिक्षक दिनानिमित्त शनिवारी जिल्हा परिषदेच्या सभागृहात जिल्ह्यातील आदर्श शिक्षकांना पुरस्कार प्रदान करण्यात आले. या सोहळ्यात त्या बोलत होत्या. यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. मल्लीनाथ कलशेट्टी, जिल्हा परिषद उपाध्यक्ष बाळासाहेब मांगूळकर, शिक्षण सभापती नरेंद्र ठाकरे, शिक्षणाधिकारी (प्राथमिक) डॉ. सुचिता पाटेकर, शिक्षणाधिकारी (माध्यमिक) चिंतामण वंजारी, डायटचे प्राचार्य आंबेकर, उपशिक्षणाधिकारी वाल्मीक इंगोले, बांधकाम सभापती सुभाष ठोकळ, समाजकल्याण सभापती लता खांदवे, शिक्षण समिती सदस्य अलका टेकाम, जिल्हा परिषद सदस्य मिलिंद धुर्वे, प्रभाकर उईके आदी मान्यवर उपस्थित होते.डॉ. फुपाटे म्हणाल्या की, आज स्पर्धेच्या युगात डिजिटल शाळेसाठी शिक्षक प्रयत्न करीत आहेत. आतापर्यंत ८६ शाळा डिजिटल झाल्या आहेत. अनेक शाळांमध्ये संगणक, सुरक्षाभिंत यासारख्या बाबी नाहीत. अशा ठिकाणी समाज सहभागातून काम करावे. गावकरी नक्कीच पुढे येतील, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. तंबाखूमुक्त शाळेसाठी पुढाकार घेण्याचे आवाहनही त्यांनी शिक्षकांना केले. मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. मल्लीनाथ कलशेट्टी यांनी आदर्श शिक्षकांची योग्य निवड केल्याबद्दल प्राथमिक शिक्षणाधिकारी डॉ. सुचिता पाटेकर आणि शिक्षण सभापती नरेंद्र ठाकरे यांचे कौतुक केले. जिल्हा परिषद शाळांची गुणवत्ता वाढविण्यासाठी शिक्षकांनी यापुढे अधिक जोमाने प्रयत्न करावे, असे त्यांनी सांगितले.शिक्षण सभापती नरेंद्र ठाकरे यांनी जिल्हा परिषदेच्या शाळा नव्या प्रयोगाच्या दृष्टीने पुढे येत असल्याबद्दल शिक्षकांचे कौतुक केले. कामाची गती अशीच कायम ठेवण्याचे आवाहन शिक्षकांना केले. प्रास्ताविक प्राथमिक शिक्षणाधिकारी डॉ. सुचिता पाटेकर यांनी केले. यावेळी जिल्ह्यातील १६ शिक्षकांना आदर्श शिक्षक पुरस्कार प्रदान करण्यात आला. आंतरराष्ट्रीय मेळाव्यासाठी निवड झालेल्या स्काउट गाईडच्या पाच शिक्षिकांचा सत्कार करण्यात आला. (शहर वार्ताहर)
गुणवत्ता वाढवा, पटसंख्याही वाढेल
By admin | Updated: September 6, 2015 02:20 IST