पुसद : विषाणुजन्य आजरामुळे शहरासह ग्रामीण भागातही तापाचे तसेच सर्दी-खोकल्याचे रुग्ण वाढले आहे. ताप किंवा सर्दी खोकला असे आजार अंगावर न काढता त्वरित डॉक्टरांकडे दाखविने गरजेचे आहे. कारण ताप हा हिवताप किंवा टाईफाईड, डेग्यु, चिकणगुणिया काविळ असाही असु शकतो. या तापावर वेळीच नियंत्रण न मिळविल्यास हा ताप जीवघेणाही ठरू शकतो. पुसद शहरासह तालुक्यात सध्या विषाणुजन्य आजाराने तोंड वर काढले आहे. ताप, सर्दी, खोकला, अंगदुखी यासह विविध आजाराचे रुग्ण घरोघरी आढळून येत आहेत. त्यामुळे शहरासह विविध ठिकाणच्या प्राथमिक आरोग्य केंद्रांमध्ये आणि खासगी रुग्णालयातही रुग्णांची मोठी संख्या दिसून येत आहे. सकाळपासूनच रुग्णालयात रांगा लागत आहेत. अनेक जण विविध आजारांंनी ग्रस्त असतानाही असे आजार अंगावर काढतात किंवा स्वत:च्याच मनाने मेडिकलमधून गोळ््या विकत घेऊन त्याचा वापर करतात. ही पद्धती अतिशय चुकीची असून, कोणत्याही प्रकारच्या तापासाठी त्वरित डॉक्टरांकडून तपासणी करून घ्यावी असे आवाहन तालुका आरोग्य विभागाने केले आहे. वातावरणातील बदलामुळेसुद्धा रुग्णसंख्येत वाढ होत आहे. रुग्णालयांमध्ये टायफाईड, हिवताप, सर्दी, खोकला अशा रुग्णांची संख्या लक्षणीय आहे. अनेक रुग्णांना भर्तीसुद्धा करून घेण्यात येत आहे. त्यामुळे रुग्णालयातील बेडसुद्धा अपुरे पडत असल्याचे दिसून येत आहे. पुसद शहरात १०० पेक्षा अधिक लहानमोठे डॉक्टर आहेत. त्यातील अनेक डॉक्टर तर रुग्ण चांगला असेपर्यंत आपल्याकडे ठेवायचा आणि गंभीर झाला की, नांदेड, यवतमाळ व नागपूर सारख्या ठिकाणी रेफर करायचा अशी पद्धती अवलंबितात. अलिकडे खासगी डॉक्टरांची तपासणी फीसुद्धा वाढली आहे. त्यातच ते लिहून देत असलेली महागडी औषधी सर्वसामान्य रुग्णांच्या अवाक्या बाहेर असते. परंतु नाईलाजास्तव कर्ज काढून का होईना रुग्णालयात गेल्याशिवाय रुग्णांनाना दुसरा पर्याय नसतो. परंतु वैद्यकीय क्षेत्रातही आता पैसे कमविण्याची प्रवृत्ती वाढीस लागली आहे. अशाही परिस्थितीत काही डॉक्टर मात्र या व्यवसायाला व्यवसाय न मानता तसेच पैशाला महत्व न देता सेवाभावी वृत्तीने रुग्णसेवा करीत आहेत. परंतु अशा डॉक्टरांची संख्या बोटावर मोजण्या इतपतच आहे. एकीकडे तालुक्यात रुग्णांची संख्या मोठ्याप्रमाणात वाढत असताना जिल्हा आरोग्य विभागाचे मात्र याकडे दुर्लक्ष आहे. तालुक्यातील वैद्यकीय विभागाचा कारभार अतिशय सुस्त आहे. तेथे रुग्णांसाठी कोणत्याही प्रकारच्या सोयीसुविधा उपलब्ध नाहीत. वेळेवर उपचारही मिळत नाही. त्यामुळे ग्रामीण भागातील रुग्णांना आर्थिक भुर्दंड सहन करून तालुक्याच्या ठिकाणी उपचारार्थ जावे लागते. (तालुका प्रतिनिधी)
पुसद परिसरात रुग्णसंख्येत वाढ
By admin | Updated: October 18, 2014 02:05 IST