२३ टक्के वाढ : फेब्रुवारी-मार्चच्या परीक्षेपासून अंमलबजावणीवणी : महाराष्ट्र राज्य उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने १० वी १२ वीच्या परीक्षा शुल्कात २३ टक्के वाढ केली आहे. ही वाढ फेब्रुवारी-मार्च २०१७ मध्ये होणाऱ्या परीक्षेपासून लागू होणार असल्याचे राज्य मंडळाच्या सचिवांनी ७ सप्टेंबरला काढलेल्या एका परिपत्रकातून जाहीर केले आहे.मागील अनेक वर्षांपासून शिक्षण मंडळाने परीक्षा शुल्कात वाढ केली नव्हती. १० वीला आयसीटी हा नवा विषय सुरू झाला. विज्ञान विषयाचे दोन पेपर झाल्याने पेपरच्या संख्येत वाढ झाली. प्रात्यक्षिक परीक्षेसाठी बाह्यपरीक्षक देणे सुरू केले. १० वीची कलचाचणी घेणे सुरू केले. त्यामुळे मानधनाच्या खर्चात मोठी वाढ झाली. त्यामुळे शिक्षण मंडळाने शासनाच्या परवानगीने १० वी १२ वीच्या परीक्षा शुल्कात वाढ करण्याचा निर्णय घेतला. दहावीचे परीक्षा शुल्क ३४० रुपयांवरून ४१५ रुपये करण्यात आले आहे. तंत्र विषय घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी ४२५ रुपये शुल्क आकारण्यात येणार आहे. श्रेणी सुधार योजनेसाठी बसणाऱ्या विद्यार्थ्यांचे शुल्कही वाढविण्यात आले आहे. १२ वीचे परीक्षा शुल्क ३५५ रुपयांवरून ४३० रुपये तर प्रात्यक्षिक परीक्षेच्या प्रती विषयासाठी १५ रुपये शुल्क तर एमसीव्हीसी विषयासाठी प्रतिविषय ३० रुपये शुल्क करण्यात आले आहे. श्रेणीसुधार योजनेअंतर्गत बसणाऱ्या विद्यार्थ्याला ६५० रुपयांवरून ८०० रुपये शुल्क करण्यात आले आहे. शिक्षण मंडळाने १० वी व १२ वीच्या परीक्षेची कामे करणारे परीक्षक, समिक्षक, केंद्र संचालक पर्यवेक्षक व अन्य कर्मचाऱ्यांचे मानधन मात्र अनेक वर्षांपासून जैसे थे आहे. शिक्षकांना व परिक्षेत काम करणाऱ्या चतुर्थ श्रेणी कर्मचाऱ्यांनाही सारखेच मानधन दिले जात आहे. त्यामुळे शिक्षकांच्या सर्व स्तरावरील मानधनात वाढ करण्यात यावी, अशी मागणी शिक्षक अनेक दिवसांपासून करीत आहे. (स्थानिक प्रतिनिधी)
शिक्षण मंडळाच्या परीक्षा शुल्कात वाढ
By admin | Updated: September 10, 2016 00:50 IST