तक्रार : महागाव पंचायत समितीचा कारभार महागाव : प्रधानमंत्री आवास योजनेत अपात्र लाभार्थ्याची निवड करण्यात येत असून निकष डावलून लाभ दिला जात असल्याच्या तक्रारी वाढत आहे. महागाव पंचायत समितीच्या या कारभाराची तक्रार वाघनाथ येथील सरपंचाने वरिष्ठांकडे केली आहे. वाघनाथ येथील लाभार्थ्यांना लाभ देताना एकाच घरातील तीन-तीन सदस्यांना लाभ दिला आहे. गावातील गरजवंतांना ग्रामसेवक पैसे मागत असल्याचा आरोपही या तक्रारीत करण्यात आला आहे. निवडलेल्या लाभार्थ्यांची पुन्हा चौकशी करून गरजवंतांना आवास देण्याची मागणी होत आहे. गरिबांना घरे देण्यासाठी पंचायत समितीस्तरावर एक पदाधिकारी सक्रिय असून तो बीडीओ, ग्रामसेवक आणि लाभार्थ्यात समेट घडवून आणत असल्याचा आरोप होत आहे. लाभार्थी निवड ग्रामसभेतून करावयाची असताना या सभेला डावलल्याचा आरोप बहुतांश गावातील सरपंचांनी केला आहे. याकडे वरिष्ठांकडून दुर्लक्ष होत असल्याने नागरिकांमध्ये रोष आहे. या प्रकरणाच्या चौकशीची मागणी होत आहे. (शहर प्रतिनिधी) गरजूंना योजनेतून डावलले एकीकडे प्रधानमंत्री आवास योजनेसाठी अपात्र लाभार्थ्यांची निवड करण्यात येत असताना दुसकरीकडे मात्र गरजवंतांना डावलल्या जात असल्याचा आरोप आहे. ज्यांच्यासाठी ही योजना आहे, त्यांच्यापर्यंतच ही पोहचत नसल्याने शासनाच्या मूळ हेतुला हरताळ फासण्याचा प्रकार सबंधितांकडून होत आहे. याकडे वरिष्ठांकडून कोणतेही लक्ष दिले जात नाही. तक्रारींची दखलच घेत नाही, त्यामुळे ग्रामसेवक व यात गुंतलेल्या इतरांचे फावत आहे.
प्रधानमंत्री आवास योजनेत अपात्र लाभार्थ्यांची निवड
By admin | Updated: January 6, 2017 01:59 IST