पुसद : दीपोत्सवातील पूजनासाठी पारंपरिक खतावण्या बाजारात दाखल झाल्या आहेत. यावर्षी खतावणीच्या किंमतीत १५ टक्क्याने वाढ झाली आहे. लक्ष्मी पूजनाच्या दिवशी व्यापारी वर्गात वही पूजनाची परंपरा आहे. या खास मुहूर्तावर खतावणीची खरेदी करण्यात येते. अलिकडे काही वर्षात व्यापाऱ्यांचे सर्व आर्थिक व्यवहार संगणकाच्या माध्यमातून चालत असले तरी खतावणीचे महत्व कमी झालेले नाही. लाल रंगातील, लक्ष्मीचा फोटो असलेल्या वेगवेगळ्या प्रकारातील खतावण्याजवळपास २५ ते १५० रुपयापर्यंत बाजारात उपलब्ध आहे. व्यापारी, उद्योजक, त्याच प्रमाणे शेतकरीही या खतावणीचा उपयोग आर्थिक नोंदीसाठी करीत आहे. वर्षभरातील जमा-खर्चाच्या नोंदीसाठी घेतलेले कर्ज, केलेली परतफेड, झालेला नफा याची नोंद या खतावणीमध्ये करण्यात येते. व्यापारी दिवाळी ते दिवाळी अशी खतावणी लिहित असल्याने रजिस्टरला मागणी असली तरी महाजनी वहीला मात्र मागणी कमी आहे. लेटल बुक १८० ते २०० रुपयात, रजिस्टर ३५० - ७०० रुपये, कॅलेंडर ३० ते १०० रुपयापर्यंत, महाजनी वही ५०० ते १५०० रुपयांपर्यंत बाजारात उपलब्ध आहे. खतावण्या मुंबई, नागपूर येथून आणल्या जातात. यावर्षी ९ नोव्हेंबर रोजी धनत्रयोदशीचा मुहूर्त आहे. यादिवशीचा काही वेळ खतावणी खरेदीसाठी उत्तम असल्याचे सांगितले जाते. या खतावण्या पूर्वीप्रमाणेच तयार केलेल्या आहेत. मात्र कागदाच्या किमती वाढल्याने १५ टक्के एवढी वाढ झाल्याचे सांगितले जाते, अशी माहिती श्रीरंग सरनाईक यांनी दिली. (तालुका प्रतिनिधी)
खतावणीचे महत्त्व कायमच
By admin | Updated: November 8, 2015 02:28 IST