कळंबची घटना : यवतमाळात कारवाई कळंब : अवैध गर्भपात प्रकरणात कळंब येथील डॉक्टर पुत्रास उपविभागीय अधिकाऱ्याच्या पथकाने यवतमाळातून अटक केली आहे. तर डॉक्टर दाम्पत्याला न्यायालयाने तात्पुरता जामीन मंजूर केला आहे. कळंंब तालुक्यातील बोरी महल येथील रंजना मेश्राम या तरुणीचा अवैध गर्भपात करताना गत १८ जूनला मृत्यू झाला होता. तर तिचा प्रियकर दुर्वेश दादाराव बठे रा. रासा याने विषारी औषध प्राशन करून आत्महत्या केली होती. या प्रकरणी डॉ.ज्योती तुंडलवार, डॉ. मोहन तुंडलवार या दाम्पत्यासह त्यांना यात मदत करणारा त्यांचा मुलगा डॉ.अक्षय तुंडलवार याच्यावरही गुन्हा दाखल झाला होता. घटनेनंतर डॉक्टर दाम्पत्य पसार झाले होते. या घटनेने कळंब शहरात तणाव निर्माण झाला होता. नागरिकांनी पोलीस ठाण्यावर धडक देऊन अटकेची मागणी केली होती. मात्र डॉक्टर दाम्पत्य पोलिसांच्या हाती लागत नव्हते. पोलिसांनी तपास जारी करून तपास सुरु केला होता. दरम्यानच्या काळात डॉ.ज्योती व डॉ. मोहन तुंडलवार यांनी न्यायालयातून तात्पुरता जामीन मिळविला होता. मात्र त्यांचा मुलगा पसार होता. त्याचा शोध पोलीस घेत होते. दरम्यान उपविभागीय पोलीस अधिकारी राहुल मदने यांच्या पथकाने बुधवारी यवतमाळात डॉ.अक्षय तुंडलवार यांना अटक केली. त्याला कळंब पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे. (तालुका प्रतिनिधी)
अवैध गर्भपातप्रकरणात डॉक्टर पुत्रास अटक
By admin | Updated: July 7, 2016 02:32 IST