सचिंद्र प्रताप सिंह : जिल्हा ग्राहक संरक्षण परिषदेची बैठकयवतमाळ : जिल्ह्यातील काही शाळांमध्ये विद्यार्थ्यांना लागणारी पुस्तके, गणवेश, बॅग व इतर साहित्य शाळांमधूनच खरेदी करण्यास भाग पाडत असल्याचे निदर्शनास येत आहे. पालक या वस्तू कुठूनही खरेदी करू शकतात. मात्र शाळेतूनच खरेदी करण्याची सक्ती केली जात असल्यास संबंधित शाळेची शिक्षण विभागाकडे लेखी तक्रार नोंदवा. या तक्रारीच्या अनुषंगाने शाळांवर कार्यवाही केली जाईल, असे जिल्हाधिकारी सचिंद्र प्रताप सिंह यांनी सांगितले.महसूल भवन येथे जिल्हा ग्राहक संरक्षण परिषदेची बैठक आयोजित करण्यात आली होती. त्यावेळी ते बोलत होते. बैठकीला जिल्हा पुरवठा अधिकारी शालीग्राम भराडी, उपप्रादेशिक परिवहन अधिकारी श्याम झोळ, वीज वितरणचे अधीक्षक अभियंता विजय भटकर, अन्न व औषध प्रशासनचे सहाय्यक आयुक्त राऊत, पुरवठा विभागाचे तहसीलदार काळे यांच्यासह अशासकीय सदस्य डॉ. नारायण मेहरे, हितेश शेठ, श्रीधर देशपांडे यांच्यासह अन्य सदस्य उपस्थित होते.यावेळी काही अशासकीय सदस्यांनी शाळा विद्यार्थ्यांसाठी लागणारे गणवेश, पुस्तक व अन्य साहित्य शाळेतूनच खरेदी करण्यासाठी सक्ती करीत असल्याचे सांगितले. पालकांना शाळेतून अशी खरेदी करणे सक्तीचे नाही. शाळा यासाठी आग्रह धरत असल्यास पालकांनी आपल्या संबंधित शिक्षण विभागाच्या गटविकास अधिकाऱ्यांकडे लेखी तक्रार नोंदवावी. पालकांना स्वत:च्या इच्छेने सदर साहित्य कोठूनही खरेदी करण्याचा अधिकार आहे, असे जिल्हाधिकारी म्हणाले.ज्या संस्था ही खरेदी बंधनकारक करीत असेल अशा संस्थांच्या वारंवार तक्रारी आल्यास संबंधित शाळांची मान्यता कायमस्वरूपी काढण्याची कार्यवाही केली जाईल, असे ते म्हणाले. यावेळी काही सदस्यांनी इंग्रजी माध्यमाच्या नर्सरी व काही शाळा मान्यताप्राप्त नसतानाही सुरु असल्याचा मुद्दा बैठकीत उपस्थित केला. अशा शाळांची तपासणी करून अहवाल तत्काळ सादर करण्याचे निर्देशही जिल्हाधिकाऱ्यांनी यावेळी शिक्षण विभागास दिले. (स्थानिक प्रतिनिधी)वीज बिलाचे वितरण वेळेत कराएलईडी बल्बची काही वर्षांसाठी गॅरंटी आहे. या मुदतीत बल्ब नादुरुस्त झाल्यास बदलून देणे आवश्यक आहे. मात्र असे बल्ब बदलून दिले जात नसल्याचे काही सदस्यांनी बैठकीत सांगितले. ज्या कंपनीकडे एलईडी बल्बचे काम आहे, त्यांनी तत्काळ बदलून द्यावे, अथवा सदर कंपनीवर कार्यवाही करा, असे निर्देशही जिल्हाधिकाऱ्यांनी वीज वितरण कंपनीच्या अधिकाऱ्यांना दिले. वीज बिलाचे रिडींग व बिलाचे वितरण योग्य व कालमर्यादेत होण्याच्या सूचनाही जिल्हाधिकाऱ्यांनी बैठकीत दिल्या.
गणवेश, पुस्तकांच्या खरेदीची सक्ती केल्यास तक्रार नोंदवा
By admin | Updated: July 9, 2016 02:43 IST