जिल्हा रुग्णालयात टाहो : मुकी, मतिमंद तरीही मर्द मातांअविनाश साबापुरे यवतमाळअज्ञात भामट्याने नको तिथे मर्दुमकी गाजविली अन् एका मतिमंद तरुणीवर मातृत्व लादले. मतिमंद असली तरी तिचे मातृत्व जिंकले. लेकराला पोटातच मारण्याऐवजी जन्म दिला. आता खाण्याचीही सोय नाही अन् लेकराला पाजण्याचेही भान नाही. कुणी तरी या बाळाला दत्तक घ्यावे, एवढीच आस आजी लावून बसली आहे. आईबाबा अपत्य जन्मास घालतात, पण हे बाळ जन्मल्याबरोबर त्याच्यासाठी आईबाबाचा शोध सुरू झाला आहे.जिल्हा शासकीय रूग्णालयाचा प्रसुती विभाग गेल्या दोन दिवसांपासून या मायलेकरांच्या कहानीचीच चर्चा करीत आहे. मंगला, तिचं बाळ आणि आई सुलोचनाबाई हे तीन जीव साऱ्यांच्या नजरा वेधून घेत आहेत. आर्णी तालुक्यातील एका गावातील हे कुटुंब. अत्यंत गरीब. सुलोचनाबाई यांच्या पोटी जन्माला आलेली मंगला काहीशी मतिमंद. भरीसभर, ती मुकीही अन् बहिरीही आहे. आई-बाबा मोलमजुरीसाठी सतत घराबाहेर. याच परिस्थितीचा गैरफायदा घेत कुणीतरी मंगलावर मातृत्व लादले. मूकबधीर अन् मतिमंद मंगला कुठेच वाच्यता करू शकली नाही. काही दिवसांनी आई सुलोचनाबाईच्या लक्षात ही गोष्ट आली. तेव्हा तिने बाळ ‘पाडण्या’ऐवजी सुरक्षित ‘डिलेव्हरी’ करण्यावर भर दिला. तिला पोलिसात तक्रार देण्याचा सल्ला गावातल्या अनेकांनी दिला. पण सुलोचनाबाई म्हणाल्या, ‘आम्ही गरीबायनं कोणाचं नाव घ्याव? अन् तक्रार करून तरी काय झालं असतं?’शेवटी सुलोचनाबार्इंनीच मंगलाला एसटीत बसून आणले अन् जिल्हा रुग्णालयात दाखल केले. गेल्या शुक्रवारी ११ डिसेंबरला मंगलाने गोंडस बाळाला जन्म दिला. मजुरीतून जोडलेले चारशे रुपये संपले. आता मुलगी आणि नातू घेऊन गावाकडे जावे तर सुलोचनाबाईच्या गाठीशी पैसाच नाही. रोजच्या जेवणाचेही वांदे. डॉक्टर म्हणतात, आता घराकडे जा. पण या मायलेकींची आर्थिक अन् मानसिकही तयारी नाही. बाळ जन्मून आठवडा झाला, पण कोणताच नातेवाईक कोडकौतुकासाठी आला नाही. सुलोचनाबाई म्हणते, आमच्या गावात एक तं मजुरीच भेटत नाई. कधी कधी तं हप्ता-हप्ताभर काम लागत नाई. आमचीच खाण्याची सोय नाई. या लेकराले कसं पोसाव? कोणी वज करणारा माणूस येईन तं त्याले हे लेकरू दत्तक देऊन टाकतो. सुखी राहीन बिचारा’आठव्या वर्गापर्यंत शाळेत गेलेली मंगला मंदगती असल्याने गोतावळ्यापासून तुटलेली. तिच्या अगतिकतेचा गैरफायदा घेणाऱ्यांनी घेतला. पण तिच्या आईने सुलोचनाबाईने हिंमत दाखवून आपल्या नातवाला जगात येऊ दिले. काहीही चूक नसताना त्यांच्या गरिबीवर अज्ञात भामट्याने ओरखडा उमटविला. पण मर्द माय-लेकींनी एक ‘भारतीय’ जगात आणला. आता ‘भारतीय समाज’ म्हणून या नवजात जिवाची जबाबदारी कुणीतरी घेण्याची गरज निर्माण झाली आहे.आमी सराप घेनारे मानसं नोहोय !आम्ही मोलमजुरी करणारे. माह्या लेकीसंगं कुनीतरी वाईट काम करून बसलं. आता हे जगात येनारं लेकरू पाडनारं आपन कोन? आपण सराप (श्राप) घेनारे मानसं नोहोय. आपल्याले आशीर्वाद पाह्यजे. ह्येची वज करनारं कोनी असन तं त्येनं याव अन् ह्या लेकराले दत्तक घ्याव... अशा भाषेत सुलोचनाबाई समाजाला आवाहन करीत आहे. पण गेल्या आठ दिवसांत अजून तरी कुणी या मायलेकरांची वास्तपूस्त केलेली नाही.
मी जन्मलो... मला आईबाबा मिळवून द्या !
By admin | Updated: December 18, 2015 02:53 IST