परप्रांतीय मजूर : शेतकरी झाले हवालदिलवणी : वणी, मारेगाव, झरी तालुक्यात मजूर टंचाई निर्माण झाली आहे. त्यामुळे या तिनही तालुक्यातील अनेक शेतकऱ्यांनी परजिल्ह्यातून आणि परप्रांतातून मजुरांची आयात केली. आता दिवाळीमुळे बहुतांश मजूर परतीच्या मार्गावर आहेत. वणी, मारेगाव तालुक्यात मोठ्या प्रमाणात कपाशीचे पीक घेतले जाते. या परिसरातील कापूस लांब धाग्याचा म्हणून सर्वत्र परिचित आहे. परिणामी या कापसाला चांगली मागणी असते. वणी, मारेगाव, झरी तालुक्यात कापूस हेच नगदी पीक म्हणून ओळखले जाते. परिणामी कपाशीची मोठ्या प्रमाणात लागवड होते. आता शेतात कापूस फुटून आहे. मात्र वेचणीसाठी मजूर मिळणे कठीण झाले आहे. ग्रामीण भागात बहुतांश ठिकाणी मजुरांची टंचाई जाणवत आहे. त्यामुळे अनेक शेतकऱ्यांनी परप्रांत आणि परजिल्ह्यातून कापूस वेचणीसाठी मजुरांची आयात केली आहे.वणी, मारेगाव, झरी तालुक्यात चंदपूर जिल्ह्यातील कोरपना, गडचांदूर, वाशीम जिल्हा, आंध्र प्रदेश, तसेच तेलंगणातून कापूस वेचणीसाठी मजुरांची आयात करण्यात आली आहे. सोबतच भंडारा आणि गोंदीया जिलह्याच्या झडीपट्टी परिसरातूनहीं नेक शेतकऱ्यांनी कापूस वेचाईसाठी मजूर आणले आहेत. झरी तालुक्यात तर थेट वाशीम आणि तेलंगणातून मजुरांना आणण्यात आले. या मजुरांना आणण्याचा खर्च, तसेच त्यांच्या राहण्याची व्यवस्था शेतकऱ्यांनाच करावी लागते. जाण्याचा खर्च मात्र मजूर स्वत: करतात, असे अनेक शेतकऱ्यांनी सांगितले. आता दिवाळीचा सण तोंडावर आला आहे. त्यामुळे परपांतीय आणि परजिल्ह्यातील हे मजूर गावाकडे परत जाण्याच्या तयारीत आहे. दिवाळीनंतर पुन्हा त्यांना परत आणावे लागणार आहे. त्यामुळे शेतकरी हवालदिल झाले आहेत.अनेकांच्या शेतात कापूस फुटून आहे. मात्र मजूर परत जाण्याच्या तयारीत असल्याने त्यांना चोरट्यांची भीती सतावत आहे. शेतातील कापूस दिवाळीचा हंगाम साधून चोरटे लंपास करण्याची शक्यता आहे. परिणामी शेतकरी भयभीत झाले आहे. (कार्यालय प्रतिनिधी)
शेकडो मजूर परतीच्या मार्गावर
By admin | Updated: November 7, 2015 02:39 IST