कविता तातेड : व्याख्यानमालेत प्रतिपादनयवतमाळ : निसर्ग व परमेश्वराने सर्व मानवांना स्वतंत्र अस्तित्व प्रदान केले. स्त्री-पुरुष, उच्च-निच हा भेद जर मानवाला मानवापासून दूर नेत असेल तर ही जगातील कोणत्याही धर्माची शिकवण असूच शकत नाही. जगा आणि जगू द्या, ही मोलाची शिकवण जैन धर्माने समस्त मानव समाजाला दिली. मानवता हाच जैन धर्माचा केंद्रबिंदू आहे, असे प्रतिपादन प्रा.डॉ.कविता तातेड यांनी केले. तरुण क्रांतीमंचच्या सहकार्याने निवृत्त अभियंता मित्रमंडळद्वारा आयोजित प्रबोधन व्याख्यानमालेचे त्या चौथे पुष्प गुंफत होत्या. यावेळी अमिता पापळकर यांनी त्यांचे स्वागत केले. मंचावर मंडळाचे अध्यक्ष गोपाळराव भास्करवार, सुभाष काळे आदी उपस्थित होते. संचालनाची जबाबदारी वसंत पांडे यांनी पार पाडली. वर्तमान काळ आणि भूतकाळातील न संपणारा संवाद म्हणजे इतिहास. जैनाचार्यांनी बहुभाषिक साहित्य, ३२ आगम, पुराणे याची निर्मिती करून ते समाजापर्यंत पोहोचविण्याचे कार्य कथेच्या माध्यमातून केले. यातून नीतीमत्ता जोपासण्याची शिकवण दिली. इतकेच नव्हेतर आलेख, अभिलेख मंदिरच्या बाहेरील दगडावर कोरून भारतीय संस्कृती चिरंतन स्मरणात राहील, याचीसुद्धा व्यवस्था केली. १८० अभिलेखात तत्कालिन स्त्रियांची महती विषद करणारे लेख आढळून येतात, असे डॉ.तातेड म्हणाल्या. जैन स्थापत्य कला ही त्या काळातील भारतीय संस्कृतीचे वैभव स्पष्ट करते. संपूर्ण भारतात गुंफा, लेणी, मंदिरे, अद्वितीय हस्तलिखिते ही जैन संस्कृतीची देण होय. राजा घनानंद, चंद्रगुप्त मौर्य, नंद राजघराणे यांनी जैन धर्माचा पुरस्कार केल्याचा उल्लेख आढळतो. चंद्रगुप्त द्वितीय यांच्या कालखंडात जैन धर्माची भरभराट झाली. इतकेच नव्हेतर मुस्लिम व मोगल राजवटीतसुद्धा अल्लाउद्दीन खिलजी यांनी माधवसेन या जैनाचार्याचा सन्मान केल्याचा उल्लेख आहे. हुमायू यांनी वाद-विवादात ३६३ पंडितामध्ये विजेता ठरलेले विजयसिंह सुरी यांचासुद्धा सन्मान केला, अशी नोंद इतिहासात आहे, असे डॉ.तातडे यांनी सांगितले. (वार्ताहर)
मानवता हाच जैन धर्माचा एकमेव केंद्रबिंदू
By admin | Updated: October 16, 2014 23:30 IST