लोकमत न्यूज नेटावर्कयवतमाळ : देशातील प्रत्येक नागरिक माैल्यवान आहे. या नागरिकांना वाचविण्यासाठी लसीकरण करण्यात येत आहे. देशपातळीवर ही मोहीम राबविली जात आहे. यासंदर्भात प्रत्येकाला लस मिळावी, त्यात कुठलाही गैरप्रकार होऊ नये म्हणून आधार कार्ड सक्तीचे करण्यात आले आहे. एकूण लोकसंख्येच्या ९९ टक्के आधार कार्ड निघाल्याचा दावा प्रशासनाने केला असला तरी भिक्षेकरी, बेघर नागरिक आणि इतर काही मंडळी यांच्याकडे आजही आधार कार्ड नाही. आता लसीकरण करताना आधार कार्ड नसेल तर अशा मंडळींना कोरोनाच्या लसीला मुकावे लागणार आहे. कोरोनाला हद्दपार करताना प्रत्येक जण आरोग्याच्या दृष्टीने भक्कम असणे गरजेचे आहे. अशा परिस्थितीत काही जण सुटले, तर कोरोनाचा धोका कायम राहणार आहे.
बेवारस नागरिकांची सर्वाधिक संख्या यवतमाळ शहरात जिल्ह्यामध्ये सर्वाधिक बेवारस नागरिकांची संख्या यवतमाळमध्ये आहे. याठिकाणी मंदिर, मशीद, बसस्थानक, पारधी बेडा आणि गावाबाहेर ही मंडळी मोठ्या संख्येने आहे. याशिवाय जिल्ह्यातील पुसद, नेर, दिग्रस, उमरखेड, वणी या शहरांमध्येही बेवारस नागरिकांची संख्या मोठ्या प्रमाणात आहे.बाहेरगावावरून कामानिमित्त येणारे अनेक नागरिक शहराबाहेर झोपड्या करून राहत आहेत. यातील बहुतांश नागरिकांकडे आधार कार्डसारखे दस्तऐवज नाही. अशा नागरिकांच्या नोंदीचा प्रश्न आहे.
आधार कार्ड नाही त्यांचे लसीकरण कसे होणार लसीकरण करण्यासाठी नियमावली तयार करण्यात आली आहे. या नियमांमध्ये आधार कार्ड अथवा पॅन कार्ड सक्तीचे आहे. आधार कार्ड नसेल तर साॅफ्टवेअरची यंत्रणा असे नाव साॅफ्टवेअरमध्ये स्वीकारत नाही. यामुळे अशा लाभार्थ्यांना लस देता येत नाही. प्रत्येक गोष्टीचा हिशेब सादर करावा लागतो. अशा परिस्थितीमध्ये जिल्ह्याला मिळालेली लस किती जणांना दिली. याचा हिशेब सादर करताना आधार नंबर गरजेचा आहे.