मुकेश इंगोले दारव्हानगरपरिषदेच्या वतीने प्रभाग क्रमांक १ मधील रेल्वे स्टेशन परिसरात ९२ घरकुलांचे बांधकाम करण्यात आले. परंतु संबंधित लाभार्थ्यांना अधिकृतपणे घरांचे वाटप करण्यात आले नाही. त्यामुळे अनेक वर्षे कुडाच्या घरात राहुल वैतागलेल्या लोकांनी मिळेल ते घरकूल ताब्यात घेतले पण त्याठिकाणी सुविधा नसल्याने त्यांना मरणयातनाच भोगाव्या लागत आहेत. अनेक वर्षांनंतर या घरकुलांचे बांधकाम पूर्ण झाले. परंतु नगरपरिषद प्रशासनाच्या दुर्लक्षितपणामुळे वीज, पाणी यासह अत्यावश्यक सुविधा पुरविल्या गेल्या नाहीत. त्यामुळे कुडाच्या घरातून सिमेंटच्या घरात राहायला गेल्यानंतरही या रहिवाशांना हाल सोसावे लागत आहे. एकात्मिक गृहनिर्माण व झोपडपट्टी विकास कार्यक्रमांतर्गत दारव्हा शहरातील रेल्वे स्टेशन परिसर, पेट्रोलपंपाजवळ आणि दत्त नगरमध्ये घरकुल योजना राबविण्याकरिता १० डिसेंबर २००८ मध्ये १० कोटी १५ लाख ३८ हजार रुपये मंजूर झाले होते. परंतु दोन भागात विरोध झाल्यामुळे त्याठिकाणचे काम रद्द करून काही निधी प्राप्त झाल्यानंतर रेल्वे स्टेशन परिसरात घरकूल बांधकामाची प्रक्रिया सुरू करण्यात आली. या ठिकाणी मंजूर १३६ घरकुलांपैकी ९२ घरकुलांचे काम सुरू झाल्यानंतर या योजनेचे मॉडेल तयार करून तेथील रहिवाशांना सुंदर व सर्व सुविधायुक्त घरांचे स्वप्न दाखविण्यात आले. त्यावेळी इच्छा नसतांनाही लोकांनी आपली घरे खाली करून दिली. त्यानंतर त्यांची व्यवस्था तात्पुरत्या टिनाच्या शेडमध्ये करण्यात आली तर काहींनी कुडाचे घर तयार केले. २०११ मध्ये सुरु झालेल्या या कामाला मधल्या काळात काही कारणांमुळे बराच विलंब लागला. त्यामुळे टिनाचे शेड व कुडाच्या घरात राहणाऱ्यांनी प्रचंड हाल सोसले. ऊन, पाऊस, वाऱ्याचा मारा झेलला. अनेकदा वादळामुळे घरांचे नुकसान झाले. परंतु त्याही परिस्थितीत या लोकांनी दिवस काढले. जवळपास वर्षभरापूर्वी घरकुलाचे बांधकाम पूर्ण झाले. परंतु घरकुलाचे वाटप होत नव्हते, त्यामुळे आधीच कुडाच्या घरात राहून वैतागलेल्या लोकांनी मिळेल ते घरकुल ताब्यात घेऊन त्यात आपला संसार मांडला. परंतु हालअपेष्टांनी तिथेही त्यांचा पिच्छा सोडला नाही. घरकुलाचे बांधकाम जरी पूर्ण झाले तरी त्या ठिकाणी वीज कनेक्शन देण्यात आले नाही. पाण्याची व्यवस्था करण्यात आली नाही. त्याचबरोबर इतर अत्यावश्यक सुविधा पुरविण्यात न आल्याने गेल्या वर्षभरापासून घरकुलवासियांना अंधारात दिवस काढावे लागत आहे. पाण्याच्या टाक्या बऱ्याच दिवसांपासून नगरपरिषदेमध्ये पडून आहेत. परंतु त्या घरकुलावर बसविण्यात आल्या नाही. त्यामुळे पिण्याच्या पाण्यासाठी त्यांना पायपीट करावी लागते. झोपडपट्टीत राहणाऱ्या लोकांचे जीवनमान उंचवावे त्यांना चांगल्या सुविधा मिळाव्या याकरिता शासन कोट्यवधी रुपये खर्च करते. दारव्हा शहरातसुद्धा याच उद्देशाने हा प्रकल्प मंजूर झाला होता. परंतु नगरपरिषद प्रशासनाच्या दुर्लक्षितपणामुळे ही चांगली योजना बदनाम झाल्याचे बालले जात आहे.
घरकूल मिळाले सुविधा मात्र नाही
By admin | Updated: August 19, 2015 02:43 IST