यवतमाळ : येथील लोखंडी पूल परिसरातील एका घराला बुधवारी दुपारी अचानक आग लागली. या आगीत घरातील साहित्य खाक झाले. दरम्यान, अग्निशमन दलाच्या पथकाने ही आग वेळीच आटोक्यात आणल्याने मोठा अनर्थ टळला.येथील लोखंडी पुलाजवळ शशिकलाबाई नारनवरे यांचे घर आहे. बुधवारी दुपारी त्यांच्या घरातून धूर येताना दिसू लागला. हा प्रकार नागरिकांच्या लक्षात येताच त्यांनी तत्काळ अग्निशमन दलाला पाचारण केले. तसेच परिसरातील नागरिकांनी या आगीवर नियंत्रण मिळविण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर अग्निशमन दलाने तत्काळ पोहोचून आग पूर्णत: आटोक्यात आणली. हा परिसर अत्यंत दाट वस्तीचा असून आग आटोक्यात आल्याने मोठा अनर्थ टळला.या आगीत नारनवरे यांच्या घरातील २५ ते ३० हजार रुपये किमतीचे साहित्य भस्मसात झाल्याचे सांगण्यात आले. ही आग शॉर्टसर्किटमुळे लागली. आगीची घटना माहीत होताच अनेकांनी लोखंडी पूल परिसराकडे धाव घेतली होती. सदर महिलेला मदतीची मागणी होत आहे. या प्रकरणी तहसील प्रशासनाला माहिती देण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले. (प्रतिनिधी)
लोखंडी पुलाजवळ घराला आग
By admin | Updated: March 3, 2016 02:31 IST