तिघांचा सहभाग : तळेगाव येथील घटना यवतमाळ : तालुक्यातील तळेगाव शिवारातील शेतात राखण करणाऱ्या चौकीदाराच्या खुनाचे बिंग वैद्यकीय अहवालावरून फुटले. याप्रकरणी तिघांवर खुनाचा गुन्हा दाखल झाला.अरूण जलाबाद राठोड (५३) रा. धामणी, असे मृताचे नाव आहे. तो तळेगाव येथील खुशाल नाईक यांच्या शेतावर गेल्या रखवालदारी करीत होता. शनिवार, २२ आॅक्टोबरला तो नेहमीप्रमाणे शेतात जागलीसाठी गेला. मात्र सकाळी त्याचा मृतदेहच आढळून आला. ग्रामीण पोलिसांनी पंचनामा करून याप्रकरणी प्रथम अकस्मात मृत्यूची नोंद घेतली होती. शवविच्छेदन अहवालात मात्र अरुणचा मृत्यू हा मारहाणीने झाल्याचे आढळून आले. त्यावरून पोलिसांनी परिसरात विचारपूस केली असता सोयाबीन चोरीचा प्रकार उघडकीस आला. पारवा येथील दोघे व पांढरकवडा तालुक्यातील गणेशपूर येथील संशयितांनी सोयाबीन चोरीसाठी अरुणला मारहाण केल्याचे पोलीस तपासात उघड झाले. यानंतर या प्रकरणात भिवा जलाबाद राठोड (५०) रा. धामणी, यांच्या तक्रारीवरून अज्ञात तीन आरोपींविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला. या गुन्ह्याचा तपास सहायक पोलीस निरीक्षक समाधान धनरे, जमादार संतोष ढाकरगे, राजकुमार आडे, नितीन कोवे, जयंत ब्राम्हणकर, लीलाधर वानखडे करीत आहे. (कार्यालय प्रतिनिधी)
खुनाचे बिंग फुटले
By admin | Updated: October 26, 2016 00:33 IST