कृती समिती : उच्च माध्यमिक शाळेत १५ वर्षांपासून विनावेतन कामयवतमाळ : १०० टक्के अनुदानाची मागणी करीत उच्च माध्यमिक शाळा कनिष्ठ महाविद्यालयातील शिक्षकांनी गुरुवारी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन केले. अनुदानास पात्र तुकड्यांची यादी दिवाळीपूर्वी जाहीर न केल्यास मुंबईच्या आझाद मैदानावर तीव्र आंदोलनाचा इशाराही यावेळी देण्यात आला. महाराष्ट्र राज्य कायम विनाअनुदानित उच्च माध्यमिक शाळा कृती समितीच्या नेतृत्वात जिल्ह्यातील शिक्षक गुरुवारी एकवटले होते. समितीच्या माध्यमातून राज्यातील प्रत्येक जिल्हाधिकारी कार्यालयासमोर टप्प्याने धरणे आंदोलन करण्यात येत आहे. या राज्यव्यापी आंदोलनाचा भाग म्हणून यवतमाळातही धरणे देण्यात आले. यात जिल्ह्यातील २०० उच्च माध्यमिक शिक्षक सहभागी झाले होते. शासनाने २६ जानेवारी २०१४ रोजी उच्च माध्यमिक शाळांचा कायम शब्द वगळून त्यांचे मूल्यांकन केले. मूल्यांकन प्रस्ताव तीन महिन्यांपासून आयुक्त कार्यालय पुणे येथे पडून आहे. आजवर कृती समितीद्वारे १८१ वेळा आंदोलने करण्यात आली. मात्र दखल घेण्यात आलेली नाही. जिल्ह्यातील आमदारांनीही यावेळी शिक्षकांच्या मागण्यांची दखल घेण्याची विनंती शासनाला पत्राद्वारे केली आहे. त्यामुळे आतातरी शासनाने शिक्षकांच्या मागण्या तातडीने मंजूर करण्याची गरज आहे. १५ वर्षांपासून विनावेतन काम करणाऱ्या या शिक्षकांना अनंत अडचणींचा सामना करावा लागत आहे. त्यामुळे अनुदान पात्र यादी व त्याची आर्थिक तरतूद जाहीर करून शिक्षकांना १०० टक्के पगार सुरू करावा, अशा मागणीचे निवेदन जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आले. आंदोलनात प्रा. आनंद चौधरी, यू. एस. सावळकर, के. बी. गोरे, प्रा. एस. पी. काळे, प्रा. एस. पी. चिंचोलकर, प्रा. ए. यू. कदम, प्रा. एस. डी. नरवाडे, प्रा. एन. एस. पवार, प्रा. टी. एल. राठोड, प्रा. आकाश पायताडे, प्रमोद पारधे, रवींद्र इंगळे, प्रा. श्रीकांत लाकडे, सुनील कांबळे, प्रा. एस. आर. देशकर, प्रा. एम. डी. कावडे, एम. पी. सोनटक्के, आर. आर. सायरे, एस. आर. गोरे, एस. आर. मोहुर्ले, ए. बी. राऊत, आर. बी. नार्लावार, बी. डी. चव्हाण, एन. एस. राठोड, किशोर अग्गुवार, प्रा. मुराद खेताणी, प्रा. एस. एन. लिंबाळे आदी उपस्थित होते. (स्थानिक प्रतिनिधी)
१०० टक्के वेतनासाठी शिक्षकांचे धरणे
By admin | Updated: October 21, 2016 02:18 IST