कर्तव्यावर जाताना बेपत्ता : १६ वर्षांपासून सीआरपीएफच्या जवानाचा थांगपत्ता नाही महागाव : सीआरपीएफमधील बेपत्ता मुलाचा फोटो उराशी कवटाळून एक माता दरवर्षी जिल्हा परिषदेच्या शाळेत तिरंग्याला सलाम करते. देशभक्तीपर गीतांच्या आवाजात तिचा हुंदका मात्र कुणाच्याही कानावर पडत नाही. १६ वर्षांपासून एक माऊली आपला मुलगा आज ना उद्या परत येईल या आशेवर जीवन जगत आहे. महागाव तालुक्यातील सवना येथील पांडुरंग हुलगुंडे हा तरुण केंद्रीय राखीव दलात रुजू झाला. देशाच्या सेवेला आपला मुलगा अर्पण करताना आईचे हृदय भरुन आले होते. मोठ्या अभिमानाने ती गावभर पांडुरंग देशसेवेसाठी जात असल्याचे सांगत होती. आपला मुलगा देशसेवा करतो, याचा तिलाच नव्हे तर अख्या गावाला अभिमान होता. मात्र पांडुरंग १९९८ साली सवना येथून कर्तव्यासाठी नेपाळच्या दिशेने निघाला. तो सीआरपीएफच्या ९५४ कंपनीत हवालदार म्हणून कार्यरत होता. मात्र तो कर्तव्यावर पोहोचलाच नाही. नेमका कुठे गेला याचा थांगपत्ता लागला नाही. आई धुरपताबाई यांनी पांडुरंगचा शोध सुरू केला. सीआरपीएफच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना विचारणा केली. माझ्या मुलाचा शोध घ्या असा टाहो फोडला. परंतु पांडुरंगचा थांगपत्ता लागला नाही. मात्र धुरपताबाईने संघर्ष थांबविला नाही. आज ती उतार वयातही मुलाचा शोध घेत आहे. पांडुरंगच्या मागे पत्नी, दोन मुले आहेत. २००९ साली पांडुरंगची पत्नी वंदना हिने मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात याचिका दाखल करून पतीच्या शोधासाठी शासन काय करणार अशी विचारणा केली. परंतु अद्याप उत्तर आले नाही.गेल्या १६ वर्षांपासून १५ आॅगस्ट आणि २६ जानेवारीला धुरपताबाई पांडुरंगचे छायाचित्र घेऊन गावातील जिल्हा परिषद शाळेत पोहोचते. मुलाचा फोटो हृदयाशी कवटाळत राष्ट्रध्वजाला सलामी देते. त्यावेळी ऐकू येणाऱ्या देशभक्तीपर गीतांनी अश्रू अनावरण होतात. ती माऊली मुलाच्या आठवणीने हमसून रडते. मात्र तिचा पांडुरंग अद्यापही आला नाही. केव्हा येईल कुणी सांगत नाही. १६ वर्षाचा हा संघर्ष लवकरच संपावा अशी प्रत्येकाची इच्छा आहे. पांडुरंग सुखरुप घरी परतावा यासाठी सर्वजण प्रार्थना करीत आहे. (शहर प्रतिनिधी)
मुलाचा फोटो उराशी कवटाळून मातेचा तिरंग्याला सलाम
By admin | Updated: August 14, 2014 23:55 IST