सुरीने भोसकले : आठ वर्षापूर्वी चोरीतील मारहाणीचा वचपा पांढरकवडा : आठ वर्षापूर्वी एका चोरी प्रकरणात मारहाण केल्याचा वचपा म्हणून सुरीने भोसकून एका इसमाला जागीच ठार केल्याची घटना तालुक्यातील भाडउमरी येथे शुक्रवारी रात्री ८ वाजताच्या दरम्यान घडली. या प्रकरणात बाप-लेकाविरुद्ध गुन्हा नोंदविला. रामचंद्र ऊर्फ चंदा विश्वनाथ हामंद (४२) असे मृताचे नाव आहे. तो आपल्या परिवारासह भाडउमरी येथे राहत होता. त्यांच्या शेजारी भारत बाजीराव बोरुले यांचे घर आहे. आठ वर्षापूर्वी भारत हा हामंद यांच्या घरी चोरीच्या उद्देशाने शिरला. अंगणातील खताचे पोते उचलून नेताना रामचंद्रने बघितले. त्यावेळी त्याला चांगलाच चोप देऊन पोलिसांच्या स्वाधीन केले. भारत सुटून आल्यानंतर तुला पाहून घेईल, अशी धमकी सतत देत होता. क्षुल्लक कारणावरून वाद घालत होता. शुक्रवारी रात्री जेवण झाल्यानंतर रामचंद्र पानटपरीवर गेला होता. त्यावेळी गावातील एक इसम तुमचा भाऊ चौकात पडून असल्याचे अंबादास हामंद यांना सांगितले. त्यावरून अंबादास चौकात गेला असता रामचंद्र रक्तबंबाळ अवस्थेत रस्त्याच्या कडेला पडलेला दिसला. अंगावरील शर्ट काढून पाहिले तेव्हा त्याच्या पोटातील आतडी बाहेर आल्याचे दिसले. तसेच पोटावर सुऱ्याने पाच ते सहा घाव मारल्याचे दिसले. त्याने आरडाओरडा केल्यानंतर ग्रामस्थ गोळा झाले. त्यानंतर अंबादास हामंदने पांढरकवडा पोलीस ठाणे गाठले. आठ वर्षापूर्वी चोरीच्या प्रकरणात मारहाण केल्याचा वचपा म्हणून गावातीलच भारत बाजीराव बोरुले (४८), सचिन भारत बोरुले (२२) या दोघा बापलेकांनी रामचंद्रचा खून केल्याचे म्हटले. त्यावरून पोलिसांनी गुन्हा दाखल केला. दरम्यान, रामचंद्रचा खून केल्यानंतर आरोपी सचिन हा पोलीस ठाण्यात पोहोचला. पोलिसांनी त्याला अटक केली असून भारत बोरुले याचा शोध घेत आहे. या घटनेने भाडउमरी गावात एकच खळबळ उडाली आहे. (शहर प्रतिनिधी)
भाडउमरी येथे इसमाचा खून
By admin | Updated: August 17, 2015 02:32 IST