यवतमाळ : कारेगाव बंडल येथील रेखा अशोक चिंतलवार आणि असाध्य रोगाने जगण्याची लढाई लढणारे ज्ञानेश्वर अशोक चिंतलवार यांना बँकांनी थकीत कर्जामुळे पुनर्गठणास नकार दिला. या कुटुंबाला अबुधाबी येथे तेल कपंनीत रेडिओ अधिकारी असलेले मुंबई येथील फारुख तारपूरवाला यांनी ७२ हजार रूपयांची मदत करून पीककर्जमुक्त केले.केळापूर तालुक्यातील कारेगाव बंडल येथील आत्महत्याग्रस्त कुटुंबांतील रेखा अशोक चिंतलवार व ज्ञानेश्वर अशोक चिंतलवार यांना पाटणबोरी येथील स्टेट बँक आॅफ इंडियाने २०१५-१६ थकीत पीककर्ज असताना पुनर्गठनासाठी नकार दिला होता. मात्र आबुधाबी येथील फारुख तारपूरवाला यांनी पांढरकवडा येथे येऊन राष्ट्रीयकृत बँकांचे मागील वर्षाचे ६५ हजार रूपयांचे पीककर्ज आणि त्यावरील व्याज असे ७२ हजार रुपयांचा धनादेश चिंतलवार परिवाराला शेतकरी मिशनच्या ‘सरकार आपल्या दारी’ या अभियानांतर्गत आयोजित कार्यक्रमात दिला. यावेळी कै. वसंतराव नाईक शेती स्वावलंबन मिशनचे अध्यक्ष किशोर तिवारी, उपविभागीय कृषी अधिकारी राहुल सातपुते, केळापूरचे तहसीलदार जोरावार, गटविकास अधिकारी घसाळकर, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. सावंत, अंकित नैताम उपस्थित होते.बळीराजा चेतना अभियानांतर्गत गटविकास अधिकारी यांनी या परिवाराला आधीच आर्थिक मदत दिली आहे. जिल्हा आरोग्य अधिकारी के. झेड. राठोड यांनी ज्ञानेश्वरला बाल-मधुमेह टाईप वनसाठी लागणारे महागडे विशेष इन्सुलिन असल्यामुळे अर्ली प्राथमिक आरोग्य केंद्रामार्फत देण्याचे आदेश तालुका आरोग्य अधिकारी डॉ. सावंत यांना दिले. हे औषध ठेवण्यासाठी आवश्यक असलेल्या फ्रिजसाठी तारपूरवाला यांनी तत्काळ १० हजारांची मदत रेखा चिंतलवार यांना दिली.जिल्ह्यात यावर्षी खरीप हंगामात १७३६ कोटी रुपयांचे पीककर्ज वितरित करण्याच्या सूचना होत्या. ३० जूनपर्यंत बँकांनी संपूर्ण कर्जाचे वितरण करणे अपेक्षित होते. स्वावलंबन मिशनचे अध्यक्ष किशोर तिवारी यांनी बैठक घेऊन बँकांना वेळोवेळी सूचना केल्या. परंतु प्रत्यक्षात राष्ट्रीयकृत बँकांनी उद्दिष्टाच्या केवळ ३७ टक्केच कर्ज वितरण केले आहे. त्यात स्टेट बँक आॅफ इंडियाने ४६४ कोटी पैकी १६७ कोटी रुपयांचेच कर्ज वितरित केल्याचे सांगण्यात आले. (स्थानिक प्रतिनिधी)
शेतकऱ्याला परदेशातून मदत
By admin | Updated: July 9, 2016 02:41 IST