गावकऱ्यांनो सावधान : कंपनीकडून सरपंचांना आले पत्र, नोकरीचीही फसवी हमीअकोलाबाजार : गावात मोबाईल सेवा सुरू करण्याकरिता टॉवर उभारणे सुरू असून त्याकरिता जागा भाड्याने घ्यायची आहे. याकरिता मोबाईल टॉवरच्या कंपनीकडून भरघोस आमिषे देण्यात येत आहे. जागा मालकाला अर्जासोबत रजिस्ट्रेशन फी कंपनीच्या बँक खात्यात जमा करण्यास सांगण्यात येत आहे. कंपनीने दाखविलेल्या भरघोस आमिषाला बळी पडून गावकऱ्यांची फसगत होण्याची शक्यता नाकारता येत नाही.उत्तर प्रदेशमधील गाझियाबाद येथील एका मोबाईल टॉवर कंपनीकडून गावाच्या सरपंचाला एक पत्र प्राप्त झाले आहे. या पत्रामध्ये भारत सरकारद्वारे एक मोबाईल टॉवर उभारणीकरिता गावात जागा उपलब्ध करून देण्याची मागणी करण्यात आली आहे. देशातील काही निवडक गावांमध्ये टॉवर उभारणीकरिता १०० गज जमीन आणि आॅफिसकरिता ५० गज जागेची आवश्यकता आहे. यामध्ये कंपनी जागामालकाला २० लाख रुपये अॅडव्हान्स व ४० हजार रुपये प्रतिमहिना भाडे देईल आणि कुटुंबातील एका व्यक्तीस टॉवर गार्डची नोकरी देण्यात येईल, त्याची सॅलरी १६ हजार राहील. इच्छूक अर्जदाराने जागेच्या इत्थंभूत माहितीसह कंपनीकडे अर्ज सादर करावा. अर्ज सादर केल्यानंतर १५ दिवसात कंपनी आपल्यासोबत करार करण्याकरिता आपल्याकडे येईल. अशा प्रकारचे मोठमोठे आमिष कंपनीने सरपंचाला पाठविलेल्या माहितीपत्रकामध्ये दाखविले आहे. अशा आमिषाला बळी पडणाऱ्या अर्जदारास रजिस्ट्रेशन फी म्हणून पाच हजार १०० रुपये रोख कंपनीद्वारे सांगण्यात आलेल्या बँक खात्यामध्ये जमा करण्यास आवर्जून पत्रामध्ये लिहण्यात आले आहे. माहितीपत्रकात दर्शविण्यात आलेल्या मोबाईल नंबरवरून खाते नंबर कंपनीकडून अर्जदारास सांगण्यात येईल, अशी सगळी संशयास्पद प्रक्रिया आहे.लहानशा जागेचे २० लाख रुपये अॅडव्हांस, ४० हजार रुपये मासिक भाडे व १६ हजार रुपये महिन्याची टॉवर गार्डची नोकरी या आमिषाला ग्रामीण भागातील व्यक्ती बळी पडून अर्जासोबत पाच हजार १०० रुपये कंपनीचे खात्यात जमा करेल आणि यामध्ये अनेकांची फसगत होण्याची शक्यता आहे. सदर प्रकारचे पत्र अकोलाबाजार ग्रामपंचायतला प्राप्त झाले असून या आमिषाला कुणीही बळी पडू नये, असे आवाहन सरपंच अर्चना मोगरे यांनी केले आहे. (वार्ताहर)मेहनतीला पर्याय नाहीमोबाईल टॉवर उभारणीचे निमित्त सांगून गावकऱ्यांना गंडा घालण्याची शक्यता आहे. जागेचे भाव बघता, संबंधित पत्रात दिलेली आमिषे फसवी असल्याचे उघडच आहे. इतक्या सहजा सहजी कुणीही भरघोस पैसा देऊ शकत नाही. पैसा मिळवायचा तर मेहनतीला पर्याय नाही, असे आवाहन सुज्ञ नागरिकांनी केले आहे.
टॉवरच्या नावाखाली भरघोस आमिषे
By admin | Updated: October 26, 2015 02:25 IST