गरिबांना आर्थिक भुर्दंड : ‘डॉक्टर आपल्या दारी’ योजना कागदावरप्रथमेश कवडे हरदडा नागरिकांना दर्जेदार आणि तत्काळ आरोग्यसेवा उपलब्ध व्हावी, यासाठी शासनाने उमरखेड तालुक्यात आरोग्याच्या विविध सेवा सुरू केल्या. प्रत्येक गावापासून जवळच आरोग्य केंद्र, आरोग्य उपकेंद्र, उपजिल्हा रुग्णालय आणि काही ठिकाणी आरोग्य पथक निर्माण केले आहे. मात्र या ठिकाणी कार्यरत अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या जीवकाढूपणामुळे नागरिकांना या सेवेचा समाधानकारक लाभ होत नाही. जिल्ह्याचा आरोग्य विभागही या बाबतीत उदासीन असल्याचे दिसून येत आहे. विविध प्रकारच्या आजारावर उपचार घेण्यासाठी गरीब नागरिक आरोग्य केंद्रात उपचारासाठी जातात तेव्हा त्यांना अतिशय वाईट अनुभव येतो. वैद्यकीय अधिकारी उपलब्ध राहात नाही. कनिष्ठ कर्मचारी उपचार करण्यासाठी पुढे येतात. काही ठिकाणी तर कनिष्ठ कर्मचारीसुद्धा राहात नाही. मोठ्या आशेने रुग्णालयात गेल्यानंतर उपचार न घेताच परतावे लागते. ग्रामीण भागात गंभीर रुग्णाला तत्काळ रुग्णालयात दाखल करण्यासाठी वाहने उपलब्ध होत नाही. वाहन शोधण्यापर्यंत प्रकृती अधिक गंभीर होते. हा सर्व आटापिटा केल्यानंतर रुग्णालयापर्यंत पोहोचते. मात्र तेथे उपचारासाठी कुणीही उपलब्ध राहात नाही. प्रसंगी रुग्णाला आपला जीव गमवावा लागतो. शासनाने ‘डॉक्टर आपल्या दारी’ ही योजना सुरू केली आहे. मात्र परिसरात या योजनेची पुरती वाट लागली आहे. रुग्णांना तत्काळ आणि दर्जेदार सेवा मिळावी, हा या योजनेमागील उद्देश आहे. याला हरताळ फासला गेला आहे. आरोग्य केंद्राच्या ठिकाणी वैद्यकीय अधिकारी आणि कर्मचाऱ्यांसाठी निवासस्थाने निर्माण करण्यात आली आहे. यावर लाखो रुपयांचा खर्च करण्यात आला. परंतु अधिकारी, कर्मचारी या वास्तूचा उपयोग घेत नाही. सोयीच्या ठिकाणावरून ये-जा करतात. त्यामुळे या वास्तू आता शोभेच्या वस्तू म्हणून जपल्या जात आहे. ग्रामीण भागातील ही दैना जिल्हा आरोग्य विभागाकडूनही दुर्लक्षित आहे. या केंद्रांना अपवादानेही भेटी दिल्या जात नाही. त्यामुळे स्थानिक पातळीवरील अधिकारी आणि कर्मचारी मनमानी वागतात. शिवाय रुग्णांशी त्यांची वागणूक अतिशय उद्धट असते. या बाबीकडे जिल्हा परिषदने लक्ष द्यावे, अशी मागणी आहे. बोगस डॉक्टरांचा सुळसुळाटशासकीय रुग्णालयांमध्ये योग्य सोयी-सुविधा उपलब्ध होत नसल्याचा फायदा परिसरातील बोगस डॉक्टर घेत आहेत. हा प्रकार नागरिकांच्या आरोग्याशी खेळणारा आहे. या नंतरही जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाकडून बोगस डॉक्टरांवर कारवाई होत नाही. ते देत असलेल्या औषधांविषयीही प्रश्नचिन्ह आहे.
हरदडा परिसरातील आरोग्यसेवा कोलमडली
By admin | Updated: May 17, 2015 00:12 IST