दारव्हा : तालुक्याच्या ग्रामीण भागातील बोगस डॉक्टरांविरुद्ध कारवाईसाठी आरोग्य विभागाने मोहीम सुरू केली आहे. दोन गावांमध्ये बोगस डॉक्टरांच्या दवाखान्यावर धाडी टाकण्यात आल्या. इतर ठिकाणच्या वैद्यकीय व्यावसायिकांच्या प्रमाणपत्राची तपासणी केली जात आहे.ग्रामीण भागामध्ये लोकांच्या निरक्षरतेचा फायदा घेत अनेक बोगस डॉक्टरांनी अवैध दवाखाने उघडून व्यवसाय सुरू केला होता. रुग्णांवर चुकीच्या पद्धतीने उपचार करून त्यांची लूट चालविल्याच्या तक्रारी झाल्या. यानंतर तालुका आरोग्य अधिकारी कार्यालयाने अशा बोगस डॉक्टरांविरुद्ध कारवाईसाठी मोहीम उघडली आहे.काही दिवसांपूर्वी तालुका आरोग्य अधिकारी डॉ.विलास नवरंगे, डॉ.कोल्हे, विस्तार अधिकारी बिहाडे, आरोग्य सहायक जे.यू. ढोक आदींनी चाणी येथे दवाखान्यावर धाड टाकून बोगस प्रमाणपत्र, औषधी आणि इतर साहित्य जप्त केले. महागाव येथे सर्व वैद्यकीय व्यावसायिकांची चौकशी करून प्रमाणपत्र तपासणी करण्यात आली. ही मोहीम सुरूच राहणार असून बोगस डॉक्टरांनी व्यवसाय बंद करावे. अन्यथा पोलीस कारवाई करण्यात येईल, असे सांगण्यात आले. (तालुका प्रतिनिधी)
बोगस डॉक्टरांविरुद्ध आरोग्य विभागाची मोहीम
By admin | Updated: July 7, 2015 01:59 IST