नागरिक बेजार : शिक्षकांसह तलाठी, ग्रामसेवकांच्या तालुक्यातून येरझारापोफाळी : ग्रामीण भागात नोकरी करणाऱ्या शासकीय कर्मचाऱ्यांना मुख्यालयी राहणे बंधनकारक आहे. तरीही बहुतांश कर्मचारी तालुक्याच्या ठिकाणाहून ये-जा करीत आहे. त्यामुळे कर्मचाऱ्यांना मुख्यालयाचे वावडे असून सामान्य नागरिकांना मात्र हेलपाटे मारावे लागत आहे. जिल्हा परिषद शाळेवरील शिक्षकांपासून तलाठी, ग्रामसेवकांपर्यंत सर्वच कर्मचारी तालुक्याच्या गावातून दररोज ये-जा करीत आहेत. त्याचा परिणाम ग्रामीण भागातील कामकाजावर होत आहे. जिल्हा परिषद शाळेचे शिक्षक ये-जा करीत असल्याने शाळेच्या वेळा पाळल्या जात नाही. बऱ्याच शिक्षकांचे जाणे-येणे परिवहन महामंडळाच्या बसफेरीवर अवलंबून असते. त्यामुळेच शाळा सुटण्याच्या एक तासापूर्वीच शाळेतून निघण्याची घाई सुरू होते. विशेषत: महिला शिक्षिका सायंकाळच्या पूर्वीच घरी पोहोचण्याच्या घाईत असतात. त्यामुळे विद्यार्थ्यांच्या शिक्षणामध्ये अनियमितता येत आहे. तलाठी, ग्रामसेवक यांची तर एकाधिकारशाहीच निर्माण झाली आहे. तलाठी आणि ग्रामसेवक हे ग्रामीण जनता आणि प्रशासनातील दुवा असतात. मात्र शिक्षकांप्रमाणेच हे कर्मचारीही तालुक्यातून ये-जा करतात. त्यामुळे ऐन कामाच्या वेळेस सर्वसामान्य जनतेला हे कर्मचारी उपलब्ध होत नाही. कर्मचाऱ्यांना वाटेल तेव्हा गावात अवतरतात. परंतु लोकांची कामे रेंगाळलेली असतानाही कित्येक दिवस गावात त्यांचे दर्शन घडत नाही. त्यामुळे त्रस्त झालेल्या लोकांनाच तालुक्याच्या ठिकाणी जाऊन तलाठी आणि ग्रामसेवकाचे घर शोधत फिरावे लागते. हीच अवस्था कृषी सहायकांची आहे. शेतकरी आणि कृषी विभागात दुवा साधण्याचे काम कृषी सहायक करतो. शासनाच्या निर्देशाप्रमाणे शेतकऱ्यांना मार्गदर्शन करणे, शेतीच्या परिस्थितीचा वेळोवेळी आढावा घेऊन शासनाकडे अहवाल देणे, हे त्याचे काम आहे. मात्र हे कृषी सहायक सध्या गावात किंवा शेतात क्वचितच दिसतात. तालुक्याच्या मुख्यालयी राहून केवळ कागदोपत्री कारभार करीत आहेत. ज्या उद्देशासाठी कृषी सहायकांची नियुक्ती होते, त्या उद्देशालाच हरताळ फासला जात आहे. (वार्ताहर)
सरकारी कर्मचाऱ्यांना मुख्यालयाचे वावडे
By admin | Updated: August 30, 2015 02:17 IST