दागिने लंपास : गुरख्याच्या सर्तकतेने अनर्थ टळला लोकमत न्यूज नेटवर्क मुळावा : उमरखेड तालुक्यातील मुळावा येथील मध्यवस्तीत असलेल्या सराफा दुकानाचे दार तोडून चोरट्यांनी एक लाख रुपयांचे दागिने लंपास केल्याची घटना शुक्रवारी पहाटे २ वाजताच्या सुमारास घडली. गुरख्याने आरडाओरडा केल्याने चोरटे अर्धवट माल ठेऊन पसार झाले. अन्यथा मोठा अनर्थ घडला असता. मुळावा येथील गांधी चौकात मनोज दिलीप उदावंत यांचे सराफा दुकान आहे. शुक्रवारी पहाटे २ वाजताच्या सुमारास चोरट्यांनी या दुकानाचे शटर तोडण्याचा प्रयत्न केला परंतु शटर उघडले नाही. दुसऱ्या बाजुला असलेले लाकडी दार तोडून चोरट्यांनी आत प्रवेश केला. काही वेळाने गुरखा सुरेशसिंग जोशी गस्तीवर असताना त्याला हा प्रकार दिसला. त्याने आरडाओरडा केल्याने गावकरी गोळा झाले. यामुळे चोरट्यांनी तेथून पोबारा केला. या घटनेची माहिती संजय महामुने यांनी पोलिसांना दिली. त्यावर ठाणेदार एल.डी. तावरे, सहाय्यक फौजदार प्रकाश भोसले घटनास्थळी दाखल झाले. विशेष म्हणजे, चोरट्यांनी दुकानासमोरील सीसीटीव्ही कॅमेरा फोडून टाकल्याचे दिसून आले. अकोला येथून श्वान पथकाला पाचारण करण्यात आले. हिरा नामक श्वानाने बसस्थानकापर्यंतचा माग दाखविला मात्र तेथेचे घुटमळले. ठसे तज्ज्ञांनाही पाचारण करण्यात आले. चोरट्यांनी या दुकानातून एक लाख रुपयांचे दागिने लंपास केल्याचे पुढे आले. दरम्यान या सराफा दुकानाशेजारी असलेल्या दीपक धोबे यांच्या दुकानाचे कुलूप चोरट्यांनी कापले होते. परंतु गावकरी जागे झाल्याने अनर्थ टळला. तर किरण सखाराम डुबेवार यांची दुचाकी चोरट्यांनी लंपास केली. चोरीच्या या घटनेने गावात खळबळ उडाली आहे. गांधी चौकात असलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यावरून काही धागेदोरे मिळतात काय, याचा शोध पोलीस घेत आहे.
मुळावा येथील सराफा दुकान फोडले
By admin | Updated: June 17, 2017 01:20 IST