वणी : गेल्या १८ फेब्रुवारीला घडलेल्या भीषण अपघातात जखमी झालेल्या हर्षद इंगोले याला मदत करण्यासाठी वणीकरांचे हात सरसावले आहे. अनेक व्यक्ती व सामाजिक संघटनांनी निधी गोळा करून हर्षदच्या कुटुंबीयांच्या स्वाधीन केला आहे. विद्यार्थी वाहून नेणाऱ्या व्हॅनला गेल्या १८ फेब्रुवारीला वणी ते वरोरा बायपासवर ट्रकने धडक दिल्याने चार विद्यार्थी मृत्युमुखी पडले होते. अपघातात सहा विद्यार्थी जखमी झाले. यात नववीत शिकणारा हर्षद इंगोले याची जीभ कापली गेली. त्याला अद्याप बोलता येत नाही. हर्षदची घरची परिस्थिती अत्यंत गरिबीची असल्याने त्याच्यावर उपचार करण्यासाठी त्याच्या नातेवाईकांना मदत करावी लागत होती. ही बाब ‘लोकमत’ने जनतेसमोर मांडली आणि वणीकरांचे दातृवाचे अनेक हात हर्षदच्या मदतीसाठी पुढे सरसावले. मनसेचे प्रदेश उपाध्यक्ष राजू उंबरकर यांनी त्याच्या घरी पोहोचून त्याच्या उपचाराचा व दहावीपर्यंतच्या पुढील शिक्षणाचा खर्च करण्याची तयारी दर्शविली. तसेच रोख पाच हजार रूपये त्याच्या स्वाधीन केले.शहरातील काही व्यक्तींनी गुप्तपणे आर्थिक मदत करून हर्षदच्या नावे रक्कम मुदत ठेवीमध्ये जमा करण्याचा निर्णय घेतला. त्या रक्कमेवरील दरमहा मिळणाऱ्या व्याजातून हर्षद व त्याच्या बहिणींच्या शिक्षणाला हातभार लागणार आहे. येथील छायाचित्रकार संघटनेनेसुद्धा आपल्या सदस्यांकडून २० हजार रूपयांचा निधी गोळा करून हर्षदच्या आईकडे सुपूर्द केला. अद्याप अनेक नागरिक हर्षदला मदत करण्यासाठी तयार आहेत. (स्थानिक प्रतिनिधी)मेघदूत कॉलनीतील महिलाही सरसावल्यामॅक्रून स्टुडंट अॅकेडमीतील विद्यार्थ्यांच्या वाहनाला अपघात झाला होता. या अपघातातील जखमी हर्षद इंगोलेला चिखलगाव येथील मेघदूत कॉलनीतील महिलांनी १० हजार ५०० रूपयांची मदत केली. यावेळी महिला व लहान मुलींनी हातात पणती घेऊन मृत विद्यार्थ्यांना श्रद्धांजली वाहिली. ही मदत हर्षदकडे सुपूर्द करण्यात आली.
अपघातातील जखमी हर्षदकडे मदतीचे हात
By admin | Updated: March 3, 2016 02:37 IST