यवतमाळातील प्रकार : कुत्र्यांचा स्मशानभूमीत धुमाकूळ यवतमाळ : पुरलेला मृतदेह कुत्र्यांनी उकरुन हाताचा पंजा येथील पांढरकवडा मार्गावर आणून टाकल्याची संतापजनक घटना गुरुवारी उघडकीस आली. रस्त्यावर पडून असलेला हा पंजा पाहण्यासाठी नागरिकांची एकच गर्दी झाली. यावेळी स्मशानभूमीच्या सुरक्षेवरून नागरिक चांगलाच संताप व्यक्त करीत होते. येथील पांढरकवडा मार्गावर असलेल्या मोक्षधामात दहन आणि दफन भूमी आहे. या ठिकाणी परंपरेनुसार दफन विधी केला जातो. नातेवाईक अंत्यसंस्कार करून परत जातात. मात्र येथे पुरलेले प्रेतही आता सुरक्षित नसल्याचे दिसत आहे. या स्मशानभूमीत दफन विधी पार पाडला जातो. त्या परिसरात कोणतीही सुरक्षा व्यवस्था नाही. त्यामुळे येथे मोकाट जनावरांचा मुक्त संचार असतो. त्यात कुत्र्यांची संख्याही मोठी असते. गुरुवारी अशाच मोकाट कुत्र्यांनी पुरलेले एक प्रेत उकरले. एवढेच नाही तर या प्रेताच्या हाताचा पंजा तोडून तो थेट पांढरकवडा मार्गावर आणून टाकला. हा प्रकार या परिसरातील नागरिकांच्या लक्षात आला. पाहता पाहता बघ्यांची मोठी गर्दी झाली. याची माहिती संबंधितांना देण्यात आली. त्यानंतर हा पंजा दफन विधी केलेल्या ठिकाणी नेऊन पुन्हा पुरण्यात आला. विशेष म्हणजे या परिसरात अशा अनेक घटना घडतात. लहान मुलांचे मृतदेह आणि मोठ्या व्यक्तींच्या मृतदेहाचे अवयव कुत्रे रस्त्यावर नेहमीच आणून टाकत असल्याचे यावेळी उपस्थित नागरिक सांगत होते. नगर परिषदेला याबाबत सूचना दिल्यानंतरही अद्यापपर्यंत कोणतीही व्यवस्था करण्यात आली नाही. मृतदेहाची होणारी ही विटंबना संतापजनक असल्याने बंदोबस्ताची मागणी आहे. (शहर वार्ताहर) स्मशानभूमीच्या सुरक्षेचा प्रश्न यवतमाळ शहरातील सर्वात मोठी स्मशानभूमी येथील पांढरकवडा मार्गावर आहे. या ठिकाणी असलेल्या दफनभूमीच्या सुरक्षेचा प्रश्न नेहमीच ऐरणीवर असतो. दफन भूमी परिसराला गेट नसल्याने मोकाट जनावरे बिनधास्तपणे भटकतात. यात डुक्कर आणि कुत्र्यांचा मोठ्या प्रमाणात समावेश असतो. कुत्रे मृतदेह उकरुन काढतात. त्याचे अनेकदा लचके तोडतात. कधी कधी तर अवयव रस्त्यावर आणून टाकतात. त्यामुळे या परिसरातील नागरिकांना मन:स्ताप सहन करावा लागतो. नगरपरिषदेने या ठिकाणी गेटसोबतच सुरक्षा रक्षकाची नियुक्ती करावी, अशी मागणी आहे.
पुरलेल्या मृतदेहाचा हाताचा पंजा रस्त्यावर
By admin | Updated: October 7, 2016 02:34 IST