प्रकाश सातघरे ।लोकमत न्यूज नेटवर्कदिग्रस : तालुक्यातील नांदगव्हाण धरण पुनर्बांधणीसाठी आलेले साडेचार कोटी रुपये परत गेले आहे. या पुनर्बांधणीसाठी एकूण साडेतेरा कोटींची तरतूद आहे. तथापि पुनर्बांधणीचे काम अद्यापही प्राथमिक स्तरावरच सुरू आहे.गेल्या १२ वर्षांपूर्वी पावसाळ्यात नांदगव्हाण धरण फुटले होते. धरणाच्या पाण्यात वाहून गेल्याने अनेकांचे संसार उद्ध्वस्त झाले होते. या धरणाच्या पुनर्बांधणीची मागणी सातत्याने सुरू होती. या धरणातून दिग्रस शहराला ३० वर्षांपर्यंत सतत पाणीपुरवठा होत होता. मात्र धरण फुटल्याने पाणीपुरवठा प्रभावित झाला. या धरणाच्या पुनर्बांधणीसाठी एकूण साडेतेरा कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली. त्यात प्राथमिक प्रक्रियेसाठी साडेचार कोटींचा निधी राज्य शासनाने नगरपालिकेला दिला होता. मात्र या निधीचा वापर न झाल्यामुळे तो परत गेल्याची चर्चा शहरात सुरू आहे.महसूल राज्यमंत्र्यांनी शासनाकडे पाठपुरावा करून १३ कोटी ५० लाखांचा निधी मंजूर करवून घेतला होता. मात्र नगरपालिकेच्या उदासीनतेमुळे पहिल्या टप्प्यातील साडेचार कोटींची रक्कमही निर्धारित वेळेत खर्च झाली नाही. हा निधी मार्च २०१७ पर्यंतच खर्च करायचा होता. पुनर्बांधणी निधीचा वापर योग्य पद्धतीने खर्च करण्यासाठी अनुभवी अरुणावती प्रकल्प विभागाला सुपूर्द करण्यात आला होता. तांत्रिक कारणांमुळे हा निधी खर्च झाला नसल्याची सबब आता पुढे केली जात आहे. आता हा निधी खर्च करण्यासाठी शासनाकडे मुदतवाढीची मागणी करण्यात आली आहे. त्यानुसार अवर सचिवांनी साडेचार कोटींचा निधी मार्च २०१८ पर्यंत खर्ची घालण्यास मंजुरी दिल्याचे सांगितले जाते.या मुदतवाढीसाठी महसूल राज्यमंत्री संजय राठोड, नगराध्यक्ष सदफजहा मो. जावेद, उपाध्यक्ष अजिंक्य मात्रे, जिल्हा नियोजन समितीची सदस्य केतन रत्नपारखी आदींनी पाठपुरावा केला.दिग्रसची पाणी समस्या मिटण्यास मदतधरण पुनर्बांधणीच्या निधी खर्चास मुदतवाढ देण्यात आल्याने दिग्रस शहराची पाणी टंचाईची समस्या सुटण्यास मदत होणार आहे. गेली अनेक वर्ष याच धरणातून दिग्रसला पाणीपुरवठा होतो. मात्र तो संकटात सापडला होता. धरण पुनर्बांधणीमुळे पाणीपुरवठा सुरळीत होणार आहे. त्यामुळे दिग्रसकरांची पाण्याची समस्या मिटण्यास मदत होणार आहे.अखर्चित निधीची मुदत संपली म्हणजे निधी परत गेला, असे होत नाही. निधी खर्चास मुदतवाढ मिळविण्यासाठी नगरविकास विभागाला प्रस्ताव पाठविला आहे. त्यानुसार अखर्चित निधीला मुदतवाढ मिळाली. नांदगव्हाण धरणाची पुर्नउभारणी निश्चिच होणार आहे.- सदफजहा मो. जावेदनगराध्यक्ष, दिग्रस
धरण पुनर्बांधणीचे साडेचार कोटी परत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 4, 2017 21:48 IST
तालुक्यातील नांदगव्हाण धरण पुनर्बांधणीसाठी आलेले साडेचार कोटी रुपये परत गेले आहे. या पुनर्बांधणीसाठी एकूण साडेतेरा कोटींची तरतूद आहे.
धरण पुनर्बांधणीचे साडेचार कोटी परत
ठळक मुद्देसाडेतेरा कोटींची तरतूद : नांदगव्हाण धरणाची पुनर्बांधणी रखडली, अखर्चित निधीला मुदतवाढ