प्रचंड नुकसान : हरभरा, गहू, संत्रा, पपई, आंबा मोहोर, भाजीपाला पिकांना मोठा फटकायवतमाळ : हवामान खात्याने अंदाज वर्तविल्याप्रमाणे शनिवारी सायंकाळी यवतमाळ जिल्ह्याला वादळी पावसासह गारांचा तडाखा बसला. पुसद, उमरखेड, दिग्रस, महागाव, नेर, बाभूळगाव या तालुक्यात वादळी पाऊस आणि गारांमुळे रबी पिकांचे प्रचंड नुकसान झाले. काही ठिकाणी तुरीच्या आकाराच्या तर काही भागात निंबाच्या आकाराच्या गारा बरसल्या. अचानक आलेल्या या संकटाने शेतकरी पुन्हा हादरला आहे. जिल्ह्यात सायंकाळच्या सुमारास आकाश काळ्या ढगांनी भरुन आले. काही वेळातच वादळालाही सुरुवात झाली. त्यानंतर पाऊस आणि गारांचा वर्षाव झाला. पुसद शहरात सायंकाळी ४.३० वाजता सुरू झालेले पावसाचे तांडव ५.१५ वाजेपर्यंत सुरू होते. वादळी वाऱ्यासह झालेल्या गारपिटीने पुसदकरांची दैना उडाली. रस्त्यावर, अंगणात दीड ते दोन इंचापर्यंत गारांचा थर साचला होता. शहरातील रस्ते पावसाने वाहून निघत होते. शहराचा वीज पुरवठाही खंडित झाला. देशमुखनगरातील काही घरात नाल्याचे पाणी शिरले. पुसद तालुक्यातील माळपठार परिसरातील बेलोरा येथील चंद्रकांत मारकंड यांच्या केळी बागेचे नुकसान झाले. धोंडबाराव कोल्हे यांचा तीन एकर गहू उद्ध्वस्त झाला तर शामराव मारकंड यांच्या गव्हाचे प्रचंड नुकसान झाले. (लोकमत चमू)
वादळी पावसासह गारपिटीचा तडाखा
By admin | Updated: February 28, 2016 02:26 IST