कळंब : शनिवार, सकाळी ६ वाजून ४५ मिनिटांच्या शाळेला विद्यार्थ्यांची हजेरी. पण ८ वाजले तरी विद्यार्थी बाहेरच खेळतं होते. पालकांकडून चौकशी सुरू झाली. अखेर एक शिक्षक १० वाजता दाखल झाले. पालकांचा पारा भडकला अन् येथील जिल्हा परिषद उर्दू शाळेला कुलूप ठोकून आपला राग व्यक्त केला. विद्यार्थी शाळेबाहेर असल्याने पंचायत समितीचे उपसभापती विजय गेडाम, ग्रामपंचायत सदस्य योगेश धांदे, सिध्देश्वर वाघमारे, मधुकर गोहणे, शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष मोहम्मद शफी कुरेशी, अब्दुल कलाम, मुश्ताक शेख आदींनी चौकशी केली. शिक्षक शाळेवर हजरच झाले नसल्याची माहिती गटशिक्षणाधिकारी गणेश गायनर यांना दिली. केंद्रप्रमुख संजय आसुटकर तातडीने दाखल झाले. यावेळी विद्यार्थ्यांनी शिक्षकांची अनियमितता सर्वांसमोर उघड केली. बहुतेक वेळा शिक्षक वेळेवर येत नाही. आले तरी वेळेपूर्वी निघून जातात. पोषण आहार व्यवस्थित शिजविला जात नाही, पुरेशा प्रमाणात वाटप केला जात नाही. एकही शिक्षक मुख्यालयी राहत नाही आदी समस्यांचा पाढाच विद्यार्थ्यांनी वाचला. दरम्यान, एक शिक्षक साडेनऊनंतर हजर झाला. इतर शिक्षक ११ पर्यंत पोहोचले नव्हते. एवढेच नव्हे तर, दोन शिपाई गैरहजर होते. शाळा परिसरात अस्वच्छता आढळून आली. सर्वत्र खर्रा पन्न्या व गुटाख्याच्या पुड्या पडून होत्या. दोषी शिक्षकांवर कारवाई होईपर्यंत कुलूप उघडले जाणार नाही, अशी भूमिका पालकांनी घेतली आहे. (तालुका प्रतिनिधी)
सकाळच्या शाळेवर गुरुजी १० वाजता हजर
By admin | Updated: November 15, 2014 22:55 IST