यवतमाळ : स्थानिक जवाहरलाल दर्डा अभियांत्रिकी महाविद्यालयात २०१५-१६ सत्राच्या अभियांत्रिकी प्रवेश प्रक्रियेवर मार्गदर्शन कार्यशाळा रविवार, १४ जून रोजी दुपारी ४ वाजता आयोजित करण्यात आली आहे. दरवर्षी अभियांत्रिकी महाविद्यालयात प्रवेश प्रक्रिया सामाईक केंद्रीभूत आॅनलाईन पद्धतीने पार पाडली जाते. बारावी आणि प्रवेश परीक्षांचे निकाल लागल्यानंतर विद्यार्थी व पालकांमध्ये संभ्रमाचे वातावरण असते. प्रवेश प्रक्रियेचे नियम, विविध टप्पे, आवश्यक प्रमाणपत्र, कागदपत्रांची विहित मुदतीत पूर्तता आदी विषयांबाबत विद्यार्थी व पालकांमध्ये अनभिज्ञता आढळते. त्यामुळे बऱ्याचदा चुका होवून विद्यार्थ्यांचे नुकसान होते. या सर्व प्रश्नांवर सांगोपांग चर्चा व मार्गदर्शन अधिष्ठाता तथा विभाग प्रमुख डॉ. संजय गुल्हाने हे या कार्यशाळेत करणार आहेत. प्रसंगी उपस्थित विद्यार्थी व पालकांच्या विविध शंकांचे निरसन केले जाणार आहे. ‘जेडीआयईटी’ हे अभियांत्रिकी प्रवेश प्रक्रियेतील एआरसी केंद्र (ईएन-११२०) आहे. आॅनलाईन प्रवेश अर्ज तसेच विकल्प अर्ज भरण्याची सुविधा जेडीआयईटीच्या एआरसी केंद्रात नि:शुल्क उपलब्ध करून देण्यात आली आहे. या महाविद्यालयात प्रवेश मार्गदर्शन केंद्र उघडण्यात आले असून ही सुविधा रविवारीही सुरू ठेवली जाणार असल्याचे एआरसी केंद्र प्रमुख डॉ. दिनेश पुंड, प्रवेश प्रक्रिया प्रमुख प्रा. विवेक गंधेवार, प्रा. संदीप सोनी यांनी कळविले आहे. कार्यशाळेचा लाभ घेण्याची विनंती संस्थेचे सचिव किशोर दर्डा, प्राचार्य डॉ. अविनाश कोल्हटकर यांनी केली आहे. (वार्ताहर)
‘जेडीआयईटी’मध्ये अभियांत्रिकी प्रवेश प्रक्रियेवर मार्गदर्शन कार्यशाळा
By admin | Updated: June 13, 2015 02:33 IST