यवतमाळ : मुलाच्या उपचारासाठी वडिलांनी शरीराचे अवयव विकण्यासाठी पंतप्रधानांना साकडे घातले. याबबाबतचे वृत्त मंगळवारी ‘लोकमत’मध्ये प्रकाशित होताच पालकमंत्री संजय राठोड यांनी ‘लोकमत’शी संपर्क साधून त्या बालकाला सर्वोतोपरी मदतीची ग्वाही दिली. ऊर्जा राज्यमंत्री मदन येरावार यांनीही रणवीरच्या उपचारासाठी ‘सीएसआर’च्या माध्यमातून मदतीचे आश्वासन दिले. दारव्हा तालुक्यातील प्रिंपी येथील रणवीर करण राठोड याला मस्कुलर डिस्ट्रॉफी हा दुर्धर आजार जडला आहे. या आजारावरील उपचार केवळ अमेरिकेतच होऊ शकतो. त्यासाठी किमान दहा लाख रूपये लागतील, असा प्राथमिक अंदाज आहे. मात्र घरची परिस्थिती अत्यंत बेताची असल्याने राठोड कुटुंबीय संकटात सापडले. अखेर रणवीरचे वडील करण राठोड यांनी स्वत:चे शरीर अवयव विकण्याचा निर्णय घेतला. अनेकांनी याबाबत हळहळ व्यक्त केली. पालकमंत्री संजय राठोड त्यांच्याच मतदार संघातील पिंप्रीमधील रणवीरची कहाणी वाचून गहिवरले. रणवीरला सर्वोतोपरी मदतीची ग्वाही त्यांनी दिली. ऊर्जा राज्यमंत्री मदन येरावार सध्या निजामाबादमध्ये आहेत. त्यांनाही याबाबत माहिती कळताच त्यांनीही ‘लोकमत’शी संपर्क साधून रणवीरला सीएसआरच्या माध्यमातून मदत करण्याची ग्वाही दिली. विविध कंपन्यांच्या ‘कार्पोरेट सोशल रिस्पॉन्सेबिलीटी’ निधीत जी रक्कम गोळा होते, त्यातून रणवीरला उपचार करण्यासाठी मदत देण्याचे आश्वासन त्यांनी दिले. (शहर वार्ताहर)
रणवीरच्या मदतीसाठी पालकमंत्री सरसावले
By admin | Updated: December 22, 2016 00:12 IST