उमरखेड : तालुक्यातील साखरा येथे शुक्रवारी रात्री ९.३० वाजताच्या सुमारास घरांना आग लागली. आगीत काही तासात पाच घरे जळून खाक झाली. वेळेवर अग्नीशमन दल पोहोचल्यामुळे मोठी हानी टळली. या आगीत १० लाखांचे नुकसान झाले. साखरा येथील नवीन वस्ती परिसरात रात्री अचानक एका घराला आग लागली. ही आग झपाट्याने पसरायला सुरूवात झाली. ग्रामस्थांनी आग आटोक्यात आणण्याचा पूर्ण प्रयत्न केला. मात्र हवेमुळे त्यांचे प्रयत्न अयशस्वी ठरत होते. काही मिनिटातच आगीने लगतच्या पाच घरांना कवेत घेतले. गावात आग लागल्याची माहिती उमरखेड पोलीस ठाण्याला देण्यात आली. त्यानंतर तातडीने नगरपरिषदेचे अग्निशमन बंबला पाचारण करण्यात आले. अग्नीशमन दलातील जवानांनी ही आग लवकरच आटोक्यात आणली. आगीत विठ्ठल वानखडे, गंगाराम घनसरवाड, विश्वंभर व्यवहारे, गजानन पवार, प्रकाश वानखेडे यांचे घर जळून खाक झाले. यात घरातील ज्वारी, गहू, कापूस, महत्त्वाचे कागदपत्र, जीवनोपयोगी साहित्य जळाले. तब्बल १० लाखांवर नुकसान झाले. उमरखेड तहसीलचे नायब तहसीलदार राजेश चव्हाण, तलाठी जी.डी. क्षीरसागर यांनी घटनास्थळ गाठून पंचनामा केला. या आगीत ४२ कोंबड्या जळून खाक झाल्या. प्रत्येकाने आपला जीव वाचविण्यासाठी पळ काढला. पिंजऱ्यात असलेल्या कोंबड्यांना मात्र बाहेर पडता आले नाही. आग लागल्याचे दिसतात संपूर्ण गाव पाण्याने भरलेले भांडे घेऊन आग विझविण्यासाठी धावत होते. गावकऱ्यांच्या सतर्कतेमुळेच मोठी हानी टळली. अग्नीशमन बंब येईपर्यंत आग नियंत्रणात ठेवण्याचा पुरेपुर प्रयत्न ग्रामस्थांनी केला. आगग्रस्त कुटुंबाना प्रशासनाकडून कुठलीही मदत मिळाली नाही. सर्वस्वच जळून खाक झाल्याने उघड्यावर आलेल्या या कुटुंबापुढे जीवनमरणाचा प्रश्न उभा ठाकला आहे. (शहर प्रतिनिधी)
पाच घरांना भीषण आग
By admin | Updated: May 10, 2015 01:53 IST